Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध ताणले हेले आहेत. यादरम्यान या दहशतवादी हल्ल्यात कथित सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहून जाऊ देणार नाही असे जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी शुक्रवारी म्हटले आहे.

“भारतातून एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ,” असे सीआर पाटील म्हणाले आहेत.

भारताने १९६० चा पाकिस्तानबरोबर करण्यात आलेला सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पुढील धोरण ठरवण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर जलशक्ती मंत्र्यांनी हे विधान केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निर्देश जारी केले आहेत, आणि त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अमंलबजावणी व्यवस्थित व्हावी याकरिता अमित शाह यांनीही काही सूचना दिल्याचे पाटील म्हणाले.

त्यानंतर पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, सिंधू जल कराराबाबत मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा कायद्याला धरून आणि राष्ट्रहिताचा आहे. सिंधू नदीचे एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.” भारताने पाकिस्तानला आम्ही दहशतवाद सहन न करण्याबाबात कठोर भाषेत संदेश दिला आहे, असेही भाजपा नेते पाटील म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरत भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी (२३ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षणविषयक केंद्रीय समितीच्या (सीसीएस) बैठकीनंतर १९६०च्या ‘सिंधू जल करारा’स स्थगिती देण्याचा निर्णय घेतला गेला. यानंतर इस्लामाबाद येथे गुरूवारी पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मंत्री गटाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भारताबरोबर झालेले सर्व द्वीपक्षीय करार स्थगित करण्याचा अधिकार पाकिस्तान वापरू शकतो, असे पाकिस्तानने म्हटले.

गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (२५ एप्रिल) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधत पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि तात्काळ परत पाठवा’, अशा सूचना दिल्या आहेत.

भारताने कोणते मोठे निर्णय घेतलेले आहेत?

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील. तसेच संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात असे भारत सराकरने म्हटले आहे. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील. तसेच एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा लागेल. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा सादेस. भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.