पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात माझे वडील शरद पवार यांनी सर्वप्रथम पंचायत राज निवडणुकीत महिला आरक्षण लागू केलं.
दरम्यान, संसदेत भाषण करताना सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे. आपल्या बहिणीचं चांगलं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या घरात नसतो. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं, असं सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक
खरं तर, आज महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी काँग्रेसकडून सर्वात आधी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक हे माझे पती राजीव गांधी यांचं स्वप्न होतं.या सरकारने हे स्वप्न आता लवकरात लवकर पूर्ण करावं, असं सोनिया गांधी म्हणाल्या. यानंतर भाजपाकडून महिला आरक्षण विधेयकावर बोलण्यासाठी सर्वात आधी निशिकांत दुबे उभे राहिले. यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतला.
महिला आरक्षणावर बोलण्यासाठी भाजपाकडून पुरुष मंडळींना सर्वात आधी संधी दिली जात आहे, असं अधीर रंजन म्हणाले. यावरून गृहमंत्री अमित शाह यांनी अधीर रंजन चौधरी यांना टोला लगावला. “मला अधीर रंजन चौधरी यांना विचारायचं आहे की, महिलांच्या मुद्द्यांवर फक्त महिलांनीच बोलावं का? महिलांच्या प्रश्नांवर पुरुष बोलू शकत नाहीत का?” असा सवाल शाह यांनी विचारला. भावांनी महिलांच्या हिताचा विचार करणं आणि त्यावर बोलणं ही या देशाची परंपरा आहे, असंही शाह म्हणाले.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह यांच्या विधानाचं समर्थन करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणीचं कल्याण व्हावं असं वाटतं. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं.
हेही वाचा- “…तर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ”, अजित पवार गटाचा फडणवीसांना थेट इशारा
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, महिला वर्गासाठी पुरुषही तितकेच महत्त्वाचे असतात. अनेक पुरुषांनी महिला वर्गाला सक्षम केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. त्यांच्यामुळेच आज माझ्यासारखी महिला इथे उभी आहे. भारतात सर्वात आधी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महिला धोरण राबवलं. माझे वडील शरद पवार यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा पंचायत राज निवडणुकीत महिला आरक्षण लागू केलं होतं.