पंतप्रधान एखाद्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर त्याठिकाणी उपराष्ट्रपतींना बोलावणे राजशिष्टाचाराला धरून नसते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही पंतप्रधानपदापेक्षा उच्च पदे असल्याने तसे करता येत नाही, असे ‘आयुष’ मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. राजपथावरील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारींना निमंत्रण न दिल्यावरून निर्माण झालेला वादाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. योग दिनाच्या कार्यक्रमातील अन्सारींच्या अनुपस्थितबद्दल राम माधव यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे या वादाला तोंड फुटले होते. याप्रकरणी काँग्रेसने भाजपवर दुहीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. राम माधव यांनी ट्विटरवर अनावधनाने उपराष्ट्रपतीसंदर्भात वक्तव्य केले होते. तसे घडायला नको होते. मात्र, आम्हाला आमची चूक मान्य असल्याचेही यावेळी श्रीपाद नाईक यांनी सांगितले. त्यानंतर उपराष्ट्रपतींच्या कार्यालयानेही हे प्रकरण आमच्यासाठी संपल्याचे सांगत आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण तर्काला धरून असल्याचे सांगितले.
राजपथ येथे पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निमंत्रणच दिले नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. राम माधव यांनी ट्विटच्या माध्यमातून अन्सारी यांच्या योग दिनाच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली होती. हमीद अन्सारी यांना सरकारकडून कार्यक्रमासाठी कोणतेही निमंत्रणच देण्यात आले नव्हते, असे प्रत्युत्तर माधव याच्या ट्विटला अंन्सारींच्या कार्यालयाकडून देण्यात आले. त्यांनतर हमीद अन्सारी यांची प्रकृती ठीक नसल्याचे माझ्या कानावर आल्याचे सांगत राम माधव यांनी याप्रकाराविषयी दिलगिरी व्यक्त केली आणि संबंधित ट्विट अकाऊंटवरून काढूनही टाकले होते.
काँग्रेस नेते माजिद मेमन यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली आहे. अशाप्रकारच्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपतींना निमंत्रितांच्या यादीतून वगळण्यातच कसे येऊ शकते आणि ते मुस्लिम असल्यामुळे असे करण्यात आले का, असा सवाल उपस्थित केला आहे. ही गंभीर चूक असून पंतप्रधानांनी त्याविषयी स्पष्टीकरणाची मागणीही मेमन यांनी केली होती.