आपल्या देशात इस्लामला काही धोका नाही, मात्र आपला देश आपल्या देशाची घटना ही मात्र प्रचंड धोक्यात आहे असं वक्तव्य AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. तसंच भाजपाकडून देशात हिंदुत्वाचा अजेंडा चालवला जातो आहे असाही आरोप ओवैसी यांनी केला. केरला स्टोरी सारख्या सिनेमाचे पंतप्रधान हे उत्तर प्रमोटर आणि आदर्श स्क्रिप्ट रायटर आहेत अशीही टीका ओवैसींनी केली. इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये त्यांनी ही टीका केली आहे.
देशात धार्मिक ध्रुवीकरण होत नसल्याचाही दावा खासदार ओवैसी यांनी केला आहे. जेव्हा दोन बाजू समान असतात तेव्हा ध्रुवीकरण शक्य असतं. मात्र भाजपाचा जो अजेंडा आहे तो तिरास्कार आणि द्वेष पसरवणारा आहे. त्याचा प्रचारही सोयीस्करपणे केला जातो आहे. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण होणार नाही असं ओवैसींनी म्हटलं आहे.
सध्या देशात जी परिस्थिती आहे त्याचा विचार केला तर लक्षात येतं की इस्लामला कुठलाही धोका नाही. देश संकटात आहे, देशाची घटना संकटात आहे. नव्या संसदेचं उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यावेळी हिंदू साधू संतांचा घेराव पंतप्रधान नरेंद्र मोदींभोवती होता. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त हिंदू धर्म हाच धर्म आहे असं मानतात. भाजपाचा हा अजेंडा एकतर्फी आहे. नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक उत्सव केला कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपरस्टार आहेत असंही ओवैसींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका धर्माचे पंतप्रधान आहेत की इतर धर्मांचेही पंतप्रधान आहेत? देशात इतर धर्मीयही आहेत पण संसदेत काय चित्र देशाने पाहिलं? असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.
द केरला स्टोरीवरुनही मोदींना टोला
ट्रेडमार्कची गोष्ट केली तर मला वाटतं की द केरला स्टोरी या सिनेमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरला स्टोरीसाठीचे प्रमोटर, स्क्रिप्ट रायटर आहेत. तुमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा अर्थ तुम्ही त्याद्वारे तिरस्कार पसरवायचा असतो असा होत नाही. मात्र द केरला स्टोरी या सिनेमाने काय केलं? तिरस्कारच पसरवला ना? असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.