२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी विरोधीपक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देशातील प्रमुख विरोधीपक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. संबंधित पक्षांना एकत्र करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. मंगळवारी नितीश कुमार यांनी ओडिसाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांची भेट घेतली.
नितीश कुमार आणि नवीन पटनायक या दोन नेत्यांच्या भेटीनंतर बिजू जनता दल तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली. पण नवीन पटनायक यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तिसऱ्या आघाडीत जाण्याचा आपला कोणताही मानस नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
खरं तर, नवीन पटनायक हे सध्या राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी पटनायक यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर त्यांनी तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचा कोणताही मानस नसल्याचं सांगितलं. ओडिशामध्ये बीजेडी आणि भाजपाची युती नाही. पण बीजेडीने काहीवेळा भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीतही बीजेडी भाजपा आणि काँग्रेसपासून अंतर ठेवेन आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवेन, असं पटनायक यांनी सांगितलं.
हेही वाचा- नितीशकुमार यांनी घेतली नवीन पटनाईक यांची भेट! बीजेडी मात्र विरोधकांना साथ देण्यास अनुत्सुक?
पंतप्रधान मोदींबरोबर झालेल्या बैठकीबद्दल माहिती देताना पटनायक म्हणाले की, ओडिशाशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मोदींची भेट घेतली. भुवनेश्वर येथील पुरीमध्ये उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत चर्चा केली. या विमानतळावर सध्या हवाई रहदारी खूप वाढली आहे. त्यामुळे या विमानतळाचा विस्तार करण्याबाबत मोदींशी चर्चा केली. यावर पंतप्रधानांनी सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं स्पष्टीकरण पटनायक यांनी दिलं.