किरण बेदी यांना पक्षामध्ये घेताना राज्य नेतृत्त्वाशी खूप चर्चा करण्यात आली नव्हती, असा खुलासा भाजपचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते जगदीश मुखी यांनी केला आहे. त्याचवेळी जास्तीत जास्त लोकांनी पक्षामध्ये यावे, यासाठी भाजप प्रयत्नशील असल्यामुळे कोणीही पक्षात येऊ शकतो, असेही मत त्यांनी मांडले आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. बेदी विधानसभेची निवडणूकही लढविणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते जगदीश मुखी यांच्याशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीने चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, किरण बेदी यांना पक्षात घेताना वरिष्ठ पातळीवर सखोल चर्चा झाली. मात्र, राज्य नेतृत्त्वाशी फारशी चर्चा करण्यात आली नाही. सध्या पक्षाचा प्राधान्यक्रम बदलला आहे. १० कोटी लोकांना सभासद बनवून जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनण्याला भाजपचे प्राधान्य आहे. त्यामुळे कोणीही पक्षात येऊ शकतो. कोणीही कोणाला थांबवू शकत नाही. त्यामुळे चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणुकीत पक्षाला यश मिळाले, तर कोण नेतृत्त्व करेल, याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader