“राजस्थानात आमचे सरकार स्थापन झाल्यापासूनच सचिन पायलट ते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते तसेच मागच्या दीड वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद नाहीय” असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी सांगितले. “मंत्री त्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर बोलत नव्हता, तसेच कुठला सल्लाही घेत नव्हता. आमच्यात कुठलाही संवाद नव्हता. लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धीही परस्परांशी बोलतात. लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा आहे” असे अशोक गेहलोत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आपल्याला टार्गेट केलं जातंय असं पायलट यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि विनाकारण SOG ने पाठवलेल्या नोटीसला मुद्दा बनवला. १० ते १२ आमदारांना नोटीस बजावली होती” असे गेहलोत म्हणाले. “भाजपा आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करतेय, अशी तक्रार आमच्या पक्षाने SOG कडे केली. आम्ही कुठेही त्यांचे नाव घेतले नाही. पण तेच स्पष्टीकरण देत होते. ते का स्पष्टीकरण देत होते, ते आता समोर आलंय” असे गेहलोत यांनी सांगितलं.

पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्री बनवण्यात आले, मग राजस्थानमध्ये असे का घडले नाही? या प्रश्नावर मुख्यमंत्री गेहलोत यांनी ‘तो हायकमांडचा निर्णय होता’ असे उत्तर दिले. “बहुतांश आमदारांचा मला पाठिंबा होता आणि राजस्थानची स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत वेगळी होती. राजस्थानमध्ये लोकांना मला मुख्यमंत्री झालेले पाहायचे होते” असे गेहलोत यांनी सांगितले. “जेव्हा तुम्ही अतिमहत्वकांक्षी होता, तेव्हा तुमचे विचार मागे पडतात. सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना मिठी मारेन” असे गेहलोत म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not on talking terms for 1 5 years but will hug pilot if he returns ashok ghelot dmp