भारतीय रुपयाच नव्हे तर आपल्या देशाचे आर्थिक प्रारूपच व्हेंटिलेटरवर (रुग्णशय्येवर) आहे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
लघुउद्योग भारती अखिल भारतीय परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की सध्या लोक भारतीय रुपया व्हेंटिलेटरवर आहे असे म्हणतात, पण आपल्या मते रुपयाच नव्हेतर भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रारूपच व्हेंटिलेटरवर आहे. भारत हा स्वतंत्र देश आहे व त्यामुळे इतर देशांचे अंधानुकरण करण्याची आपल्यावर सक्ती नाही. भारताने आपल्या पूर्वजांचे आर्थिक व औद्योगिक प्रारूप स्वीकारावे व जगाला ज्याची खूपच प्रतीक्षा आहे असा योग्य आर्थिक प्रारूपाचा पर्याय द्यावा.
 किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकी गुंतवणूक मान्य करायला नको होती असे सांगून आता संरक्षण क्षेत्रातही थेट परकीय गुंतवणुकीची चर्चा कशाला असा सवालही त्यांनी केला.
जर बाहेरच्या शक्ती आपल्याला काही बंधने आणत असतील तर ती आपण जुमानता कामा नये असे स्पष्ट करून ते म्हणाले, की आपण आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात स्वयंपूर्ण असले पाहिजे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावामुळे संपूर्ण जगापुढेच नवी आव्हाने आहेत.
सध्याच्या आर्थिक स्थितीवर ते म्हणाले, की देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना उत्तेजन दिले पाहिजे. भारताला जागतिक मंदीचा फटका बसला नाही याचे प्रमुख कारण म्हणजे आपण पारंपरिक आर्थिक धोरणे राबवली व लघुउद्योगांनाही पुरेसे स्थान दिले.