मुंबई बॉम्बस्फोटातील एक प्रमुख सूत्रधार टायगर मेमन याच्या नावाने धमकावण्या देत फिरणाऱ्या व्यक्तीस पाकिस्तानातील कराची येथील छाप्यात अटक करण्यात आली. अगोदर टायगर मेमन याला अटक करण्यात आल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या, पण तो टायगर मेमन नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. तो पाकिस्तानातील अनेक प्रकरणांत हवा असलेला फरकान नावाचा गुन्हेगार आहे. फरकान हा आपणच टायगर मेमन आहोत, अशा थापा मारत लोकांना धमकावत होता, त्यामुळे १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमन यालाच अटक झाल्याचे भारतात अनेकांना वाटले, पण प्रत्यक्षात फरकान याला अटक झाली. टायगर मेमन याच्यावर इंटरपोलचे वॉरंट असून, तो या बॉम्बस्फोटानंतर दुबईला पळाला व नंतर त्याचा ठावठिकाणा लागला नाही, पण तो पाकिस्तानात असल्याचे सांगण्यात येते. याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर टायगर मेमन मुंबईतील कुटुंबीयांशी बोलला होता व त्याने फाशीचा बदला घेतला जाईल, अशी धमकी तेव्हा दिली होती.

Story img Loader