यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबा देत असलेला समाजवादी पक्ष समर्थन मागे घेऊ शकतो, अशी पंतप्रधान मनमोहन सिंग शक्यता वर्तविताच सरकारला धमकावणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे सूर नरमले आहेत. यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा तूर्तास आपला कोणताही विचार नसल्याचे मुलायमसिंह यादव यांनी स्पष्ट केले आहे.
तामिळनाडूच्या मुद्यावरून द्रमुकने पाठिंबा काढून घेतल्यापासून मुलायमसिंह यादव मनमोहन सिंग सरकारविरुद्ध आक्रमक झाले असून संधी मिळेल तिथे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देत आहेत. पण गुरुवारी ब्रिक्स शिखर संमेलन संपवून डरबनहून भारतात परत येताना समाजवादी पक्ष पाठिंबा काढू शकतो, असे मनमोहन सिंग यांनी ‘मान्य’ केले होते. त्यानंतर मुलायमसिंह यांचे सूर लगेच नरमले. पंतप्रधानांनी कुठल्या आधारे हे विधान केले हे आपल्याला ठाऊक नाही. पण सत्ताधारी यूपीए आणि समाजवादी पक्षाच्या संबंधात कटुता आलेली नसून पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्ष दगाबाज असून आगामी लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीला पर्याय नाही,  असा धोशा गेल्या काही दिवसांपासून मुलायमसिंह यादव यांनी लावला आहे. परंतु, मुलायमसिंह यांचे नावडते महिला आरक्षण विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मांडण्याचा इरादा व्यक्त करून काँग्रेसने मात्र त्यांना आणखी डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यात समाजवादी पक्ष पाठिंबा काढू शकतो, या पंतप्रधानांच्या विधानाची भर पडली. त्यामुळे यूपीए सरकार आणि काँग्रेसविरुद्ध टीकेची झोड उठविणारे मुलायमसिंह यादव एकदम शांत झाले असून सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्नच येत नसल्याची त्यांनी सारवासारव केली.

Story img Loader