गेल्या दोन आठवडय़ांपासून बेपत्ता असलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे गूढ अधिकच गडद होऊ लागले आहे. हिंदी महासागराच्या अतिदक्षिण भागात आढळून आलेल्या अवशेषांमुळे पल्लवित झालेल्या आशाही अखेरीस धुळीस मिळाल्या. आहेत. संबंधित ठिकाणी शोधासाठी गेलेल्या शोधपथकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले आहे. हे अवशेष समुद्राच्या तळाशी विसावले असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
हिंदी महासागराच्या अतिदक्षिण भागात व पर्थपासून तब्बल अडीच हजार किमी खोल समुद्रात काही अवशेष तरंगत असल्याचे छायाचित्र उपग्रहाने पाच दिवसांपूर्वी प्रक्षेपित केले होते. हे अवशेष मलेशियन एअरलाइन्सच्या बेपत्ता बोइंग विमानाचे असावेत असा प्राथमिक अंदाज होता. ऑस्ट्रेलियासह मलेशिया, अमेरिका, फ्रान्स आदी देशांची जहाजे व विमाने या परिसरात शोधासाठी गेली. मात्र, संबंधित ठिकाणी त्यांना काहीही आढळले नाहीत. समुद्रावर तरंगत असलेले हे अवशेष बुडाले असावेत असा अंदाज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी व्यक्त केला. मात्र, तरीही या परिसरात अवशेषांचा शोध सुरूच राहील असा दिलासाही त्यांनी दिला. तरंगते अवशेष दर्शवणारे उपग्रहाचे छायाचित्र पाच दिवसांपूर्वीचे होते आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाण्यासाठी शोधपथकांना दोन दिवस लागले, एवढय़ा कालावधीत ते अवशेष बुडाले असावेत किंवा त्या ठिकाणाहून तरंगत शेकडो मैल दूर तरी गेले असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान, बेपत्ता विमानाच्या शोध घेण्याबाबत अजूनही आशादायी असल्याचे मलेशिया सरकारने स्पष्ट केले आहे. दोन आठवडय़ांनंतरही विमानाचा ठावठिकाणा लागत नसला तरी दिवसागणिक आम्ही प्रत्येक शक्यता तपासून पाहात आहोत व त्यानुसार कृती करत असल्याचे वाहतूकमंत्री हशिमुद्दिन हुसेन यांनी सांगितले. विमानाने समुद्रतळ गाठला असेल तर त्याच्या ब्लॅक बॉक्समधून येणाऱ्या क्षीण लहरी पकडण्यासाठी अत्याधुनिक अशा हायड्रोफोन्सचा वापर करता येईल काय, याचीही शक्यता आम्ही तपासून आहोत व त्यासाठी तज्ज्ञांची मते जाणून घेत आहोत असे त्यांनी सांगितले.

Story img Loader