जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या काँग्रेसच्या पंतप्रधानांपाठोपाठ केंद्रात सलग नऊ वर्षे पंतप्रधान राहण्याचा पराक्रम करणारे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी नववा वर्षदिन साजरा करणाऱ्या यूपीएच्या गोटात कुठलाही उत्साह दिसत नव्हता.सात रेस कोर्स येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या वर्धापन दिनाच्या वार्षिक कार्यक्रमात प्रथमच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यूपीएच्या व्यासपीठावर अवतरले. पण गेल्या वर्षी यूपीएच्या गोटात जाऊन व्यासपीठावर उपस्थित असलेले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या प्रतिनिधींनी यूपीएच्या आजच्या प्रीतीभोजनाकडे साफ पाठ फिरविली. मात्र, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा आणि ब्रजेश पाठक यांनी हजेरी लावली. झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभा सदस्य संजीवकुमार आले होते.
मनमोहन सिंग यांच्या अनुत्साही भाषणानंतर सोनिया गांधी यांनी आक्रमक भाषण केले. पण सरकार कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत विरोधी पक्षांच्या मदतीशिवाय काँग्रेसला अन्न सुरक्षा विधेयकासारख्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनाची पूर्तता करू शकत नसल्याचीही अप्रत्यक्षपणे कबुली दिली.
यूपीएच्या व्यासपीठावर एकाही नव्या मित्रपक्षाची बुधवारी भर पडली नाही.
मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, ए. के. अँटनी,  पी. चिदम्बरम आणि कमलनाथ या काँग्रेस नेत्यांव्यतिरिक्त शरद पवार, अजित सिंह, फारुक अब्दुल्ला, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, बद्रुद्दीन अजमल, जोस के. मणी, ई. अहमद, प्रफुल्ल पटेल, नागा पीपल्स फ्रंटचे चोंगशेन चँग आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रेमदास राय या नेत्यांची व्यासपीठावरील उपस्थिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होणाऱ्या यूपीएला आलेल्या अवकळेचे वर्णन करणारे ठरले.

Story img Loader