इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना एका सार्वजनिक सभेत महिला न्यायाधीशांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना ३१ ऑगस्टला या प्रकरणी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहसीन अख्तर कयानी यांच्या नेतृत्वाखालील न्या. बाबर सत्तार आणि मियाँगुल हसन औरंगजेब यांनी हे निर्देश दिले. इम्रान खान यांनी इस्लामाबाद येथे शनिवारी झालेल्या जाहीर सभेत आपल्या भाषणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश झेबा चौधरी यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सोमवारी इम्रान यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमान केल्याप्रकरणी सुनावणीसाठी विस्तारीत पीठ नियुक्त केले. सुनावणीदरम्यान न्या. कयानी म्हणाले की, इम्रान खान सातत्याने न्याययंत्रणा आणि इस्लामाबाद उच्च न्यायालयाविरुद्ध जाहीर शेरेबाजी करत असतात. हे तातडीने थांबले पाहिजे.
न्या. मियाँ गुल यांनी सांगितले, अतिरिक्त सत्र न्यायाधीश झेबा चौधरी यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
इस्लामाबादमधील शनिवारच्या सभेत इम्रान यांनी इस्लामाबादचे पोलीस महासंचालक, उपमहासंचालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन ‘तुम्हाला सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर इम्रान यांनी न्याययंत्रणेला आपल्या पक्षाविरुद्ध पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाबद्दल इशारा देताना सांगितले, की त्यांनी परिणाम भोगण्यास तयार रहावे. इस्लामाबाद पोलिसांच्या सांगण्यावरून आपले सहकारी शाहबाज गिल यांना दोन दिवस कोठडीत रवानगी केल्याबद्दल न्या. झेबा चौधरींना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
दहशतवादाचा आरोप
गेल्या आठवडय़ात खान यांच्याविरुद्ध दाखल प्राथमिक गुन्हे अहवालानुसार (एफआयआर) त्यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याच्या अनुच्छेद सात अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामाबादच्या मार्गल्ला पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना गुरुवापर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.