शब्दांचा वापर करताना फारसे गांभीर्य न बाळगण्याचा फटका गुरुवारी लेखक चेतन भगत यांना बसला. इतर चलनाच्या तुलनेत घसरणाऱया रुपयासंदर्भात ट्विटरवर केलेल्या एका ट्विटमध्ये चुकीचा शब्द वापरल्याने चेतन भगतवर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली.
‘माझ्यावर बलात्कार करणाऱयांना कोणतीच शिक्षा नाही का, असा प्रश्न रुपया विचारतोय,’ अशा आशयाचे ट्विट चेतन भगत यांनी इंग्रजीमधून केले. त्यांच्या या ट्विटवर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. बलात्काराच्या गुन्ह्यांचे गांभीर्य कमी करू नका, असा सल्ला असंख्य नेटिझन्सनी त्यांना दिला.
मुंबईतील सामूहिक बलात्कारप्रकरणातील पीडिता अजून संपूर्णपणे बरी झालेली नाही. या स्थितीत बलात्कार या शब्दाचा चुकीच्या ठिकाणी वापर करणे अतिशय असंवेदनशील आणि मूर्खपणाचे आहे, असे एका व्यक्तीने म्हटले आहे. बलात्कार हा शब्द अतिशय गंभीरपणे वापरला पाहिजे. सहज म्हणून त्याचा वापर कधीच करू नये, असे मत अनेक वाचकांनी नोंदविले.
कोणत्याही चलनावर कधीच बलात्कार होत नाही, या शब्दांत एकाने चेतन भगत यांच्या ट्विटला प्रत्यु्त्तर दिले. नेटिझन्सनी टीका सुरू केल्यानंतर चेतन भगत यांनी वादग्रस्त ट्विट काढून टाकले. मात्र, आपल्या ट्विटचे त्यांनी समर्थन केले. ‘बलात्कार शब्द वापरल्याबद्दल काही जणांनी नाराजी व्यक्त केलीये. हत्या हा शब्द योग्य वाटतोय का? थांबा… कोणीतरी या शब्दावरूनही हल्ला करण्याची शक्यता आहे…’ असे त्याने नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा