अंजूचं काय करायचं आहे ते आता अरविंद आणि पोलीस ठरवतील. माझा आणि अंजूचा काही संबंध नाही. पाकिस्तानात जाऊन ती तोंड काळं करुन आली आहे असं म्हणत अंजूच्या वडिलांनी तिच्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या फेसबुकवरच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेलेली अंजू चार महिन्यांनी भारतात परतली आहे. तिच्याविषयी तिच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अंजू दिल्ली विमानतळावरुन तिच्या ग्वाल्हेर येथील घरी जाणार आहे. तिचे वडील गयाप्रसाद यांनी मात्र माझा आणि अंजूचा काही संबंध नाही आणि तिला घरातही घेणार नाही असं म्हटलं आहे.
अंजूचे वडील काय म्हणाले?
अंजूचे वडील म्हणाले, अंजू ज्या दिवशी पाकिस्तानात गेली त्याच दिवशी माझ्यासाठी ती मेली. आता पाकिस्तानात तोंड काळं करुन ती आली आहे. मी तिला माझ्या घरात घेणार नाही. अरविंदने तिला घरात घ्यायचं आहे की नाही हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. त्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो त्याने घ्यावा. गयाप्रसाद यांनी म्हटलं आहे की माझा मुलगा कामाच्या निमित्ताने बाहेर गेला आहे. मी सध्या घरात एकटा आहे आणि माझी प्रकृती चांगली नाही. आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अरविंदने घ्यायचा आहे. अंजूने चूक केली नाही तर तो अपराध आहे आणि तो असा अपराध आहे ज्याला माफी नाही. मला माहीत आहे की ती माझ्याकडे येणारच नाही कारण मी तिच्याशी कुठलंही नातं ठेवलेलं नाही. आज तकशी बोलत असताना अंजूच्या वडिलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील ३४ वर्षीय अंजू राफेल या मुलीने जुलै महिन्यात पाकिस्तानात पळून जाऊन तिच्या फेसबुकवरील मित्राशी लग्नगाठ बांधली होती. हे लग्न झाल्यानंतर अंजू चर्चेत आली होती. इंटरनेटवर दोघांच्याही प्रेमकथेबद्दल चवीने चर्चा झाली. मात्र अवघ्या काही महिन्यातच अंजू भारतात परतली आहे. लाईव्ह हिंदुस्तान या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अंजू वाघा बॉर्डरवरून भारतात आली. तिथे सीमा सुरक्षा दलाच्या चौकीत तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुढीच चौकशीसाठी तिला दिल्ली येथे नेण्यात आले. बुधवारी भारतात आल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधिंनी तिला याबाबत प्रश्न विचारला. “मी खूश आहे, मला यापेक्षा अधिक काही बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया अंजूने दिली.
अंजूने जुलै महिन्यात पाकिस्तानच्या व्हिसाच्या आधारे वाघा बॉर्डर-अटारी बॉर्डर येथून पाकिस्तानात प्रवेश केला होता. तिचा फेसबुकवरील मित्र आणि खैबर जिल्ह्यातील रहिवासी नसरुल्लाह (वय २९) याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने नसरुल्लाहशी लग्न करत इस्लाम धर्म स्वीकारला आणि फातिमा नाव धारण केले, असे सांगितले जात होते.