कर्नाटकमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपला जोरदार धक्का दिल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डियुरप्पा यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपला झटका देण्यासाठी कंबर कसली आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याचे आपले पहिले उद्दिष्ट होते, त्यानुसार लोकांनी भाजपला धडा शिकविला. आता राज्य विधानसभेतून भाजपला हद्दपार करणे हे आपले पुढील उद्दिष्ट असल्याचे येड्डियुरप्पा म्हणाले. कर्नाटकमध्ये भाजप बळकट होण्यासाठी आपण जे कष्ट घेतले त्याची जाणीव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला होण्याची गरज आहे. आपल्या अनुपस्थितीमुळे भाजपची दयनीय अवस्था झाली असून उडुपी आणि पुत्तूर हे भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्य़ांमध्ये शहरी स्थानिक सवराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला फटका बसला आहे, असेही येड्डियुरप्पा म्हणाले. कर्नाटक जनता पक्ष निवडणुकीपूर्वी अथवा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. आम्ही स्वबळावर २२४ मतदारसंघात लढणार असून आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader