शिक्षकांच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे (आयएनएलडी) नेते ओमप्रकाश चौताला हेच यापुढेही पक्षाचे नेतृत्व करतील आणि २०१४ मध्ये हरयाणा विधानसभेची निवडणूकही लढवतील, असे पक्षाच्या वतीने शनिवारी जाहीर करण्यात आले.
ओमप्रकाश चौताला आणि त्यांचे पुत्र अजय हे राज्य विधानसभेची निवडणूक लढवतील, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक अरोरा यांनी सांगितले.
दिल्ली न्यायालयाचा निकाल अंतिम नाही, या निर्णयाला आणखी वरच्या न्यायालयात आव्हान दिले जाईल आणि त्यामधून चौताला पिता-पुत्र सहीसलामत बाहेर पडतील आणि सत्य जनतेपुढे येईल, असेही अरोरा यांनी म्हटले आहे.
ज्या आमदार आणि खासदारांना दोषी ठरविण्यात आले आहे, त्यांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले.
चौतालापुत्राची मागणी
ओम प्रकाश चौतालांनी आपल्याला उपचारांसाठी गुरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशी मागणी दिल्ली न्यायालयाकडे केली आहे तर आपल्याला सोन्याची साखळी घालण्यास तसेच घरचे जेवण मिळण्यास परवानगी मिळावी, अशी चौताला पुत्रांची इच्छा आहे.
चौताला यांना अनेक विकार असून गुरगाव येथील मेदांत रुग्णालयात त्यांच्यावर अटक होण्यापूर्वी उपचार सुरू होते. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी चौताला यांच्यावर मेदांत रुग्णालयातच उपचार करण्याची परवानगी द्यावी, असे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी विनंती चौताला यांच्या वकिलांतर्फे करण्यात आली.
चौतालापुत्र अजय यांनी आपल्याला घरी तयार केलेले जेवणच मिळावे, घरगुती कपडे-औषधे वापरण्यास मिळावीत आणि आपल्याला घरच्या मंडळींना कधीही भेटता यावे, अशा मागण्या केल्या आहेत. तसेच, आपल्याला गळ्यात सोन्याची साखळी घालण्यासही परवानगी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा