तुमच्या मोबाइलची बॅटरी संपली आहे तर अशा परिस्थितीत काय करणार? कदाचित तुम्ही चार्जिग कराल पण चार्जिगची विजेची सोयच नसेल तर काय? तुम्ही आता चक्क टेक्स्ट मेसेज पाठवून तुमचा मोबाईल चार्ज करू शकता. ही भन्नाट कल्पना आहे लंडनच्या बफेलो ग्रीड या कंपनीची. त्यांनी सौरऊर्जेवर आधारित सेलफोन चार्जिग केंद्र सुरू केले आहे. हे स्टेशन टेक्स्ट मेसेजमुळे कार्यान्वित होते. आपल्या देशात शहरी भाग वगळता ग्रामीण भागाचा विचार केला तर वीज पुरवठय़ाची स्थिती फार चांगली नाही कालांतराने ती आणखी बिकटच होणार आहे. अशा स्थितीत अशा सोलर चार्जिगची सुविधा निश्चितच लाभदायी ठरू शकते.
आपल्या नेहमीच्या वीज संजालात अनेक समस्या असतात. विकसनशील देशातील ग्रामीण भागात विशेष म्हणजे आशिया व आफ्रिकेत विजेची कुठलीही शाश्वती नाही, तिथे मोबाईलचा वापर मात्र वाढत आहे.
लंडनमधील बफेलो ग्रीड या कंपनीचे मूलभूत मोबाईल चार्जिग तंत्रज्ञान सध्या युगांडात वापरले जात आहे, तेथे त्याचा चांगला फायदाही झाला आहे असे न्यू सायंटिस्टच्या ताज्या अंकात म्हटले आहे. यात बॅटरी सोलर पॅनेलमधून वीज घेते, त्यासाठी मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग (एमपीपीटी) हे तंत्र वापरले जाते. साठ वॉटच्या सोलर पॅनेलने (सौर पट्टिका) बॅटरी चार्ज करता येते.
सोलर पॅनेलचे विजेचे आउटपुट हे पर्यावरणीय स्थितीशी निगडित असते, त्यात तापमान, सूर्यप्रकाश तसेच त्यातील सर्किट म्हणजे मंडलातील प्रतिरोध यांचा समावेश असतो. एमपीपीटीच्या मदतीने या सर्व घटकांवर तसेच प्रतिरोधातील बदलांवर नजर ठेवली जाते त्यामुळे जास्तीत जास्त विज ही चार्जिगसाठी मिळते. साठवणूक केलेल्या विजेच्या मदतीने फोन चार्ज करण्याचे हे तंत्र आहे.
बाफेलो ग्रीडच्या निर्मात्यांना सेलफोन नेटवर्क ऑपरेटर्सच्या सहकार्याने कमी दरात चार्जिग सेवा द्यायची आहे. कालांतराने मोफत सुविधा पुरवण्याचाही विचार आहे. जर तुम्ही मोबाईलला वीज दिलीत तरच त्याचा जास्तीत जास्त वापर करता येईल असे बफेलो ग्रीडचे प्रमुख डॅनिअल बेसेरा यांचे मत आहे. चार्जिगसाठी पैसे देण्यापेक्षा लोकल फोन कॉलवर जास्त खर्च करू शकतील असे त्यांचे म्हणणे आहे.

काय अन् कुठे?
लंडनमधील बफेलो ग्रीड या कंपनीचे मूलभूत मोबाईल चार्जिग तंत्रज्ञान सध्या युगांडात वापरले जात आहे, तेथे त्याचा चांगला फायदाही झाला आहे  
* वीज नाही तिथे फारच फायद्याची सुविधा
* बफेलो ग्रीडच्या मदतीने दिवसाला ३० ते ५० फोन चार्ज करता येणार
* सध्या युगांडात प्रायोगिक तत्त्वावर वापर कालांतराने मोफत चार्जिग सेवा देणार

Story img Loader