‘काळाच्या ओघातही न बदलणारा’ अशी ज्याची प्रतिमा आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रचारासाठी आता नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेची ध्येय-धोरणे तसेच निर्णय देशाच्या कानाकोपऱ्यात सहज व जलदगतीने पोहोचावेत, यासाठी संघाने सोशल मीडियाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी या गोष्टीस दुजोरा दिला आहे.
फेसबुक, ब्लॉग, ट्विटर आदी सोशल मीडियामुळे संपर्क माध्यमांत क्रांती झाली असून, तरुण वर्गाकडून या माध्यमांचा सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसत आहे. संघाने या संधीचा लाभ घेण्याचे ठरविले असून त्या दिशेने पाऊलही टाकले आहे. संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी याबाबत सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानातील या माध्यमांचा वापर संघ स्वयंसेवकांकडूनही मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. संघाचे विचार, कार्य, ध्येय-धोरणे याचा प्रसार व्हावा, यासाठी हे नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, यात शंका नाही. या माध्यमातून आमच्याबद्दलची माहिती देशभरात पोहोचू शकेल. मात्र, या माध्यमातून आपल्यावरील टीकेला उत्तर देताना भावनेच्या भरात वाहत जाऊ नका, लोकांसमोर सत्य परिस्थिती व आकडेवारी मांडा, मुद्देसूदपणे आपले विचार प्रकट करा, असा सल्ला आमच्या स्वयंसेवकांना आम्ही देत आहोत. ही माध्यमे वापरणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी आतापर्यंत पाटणा, गुवाहटी, कोलकाता आणि फरिदाबाद येथे स्वयंसेवकांच्या बैठका घेण्यात आल्या असून लवकरच भोपाळ, अलाहाबाद आणि भुवनेश्वर येथे बैठका आयोजित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.  
संघाला वाढता प्रतिसाद
संघाच्या अधिकृत वेबसाइटवर ‘जॉइन आरएसएस’ ही लिंक असून तिला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद लाभला आहे, असे वैद्य म्हणाले. गेल्या वर्षी या माध्यमातून आम्हाला १२ हजार ११५ रिक्वेस्ट आल्या असून, यंदा ऑगस्ट अखेपर्यंत तब्बल १९ हजार रिक्वेस्ट आल्या आहेत. अशी रिक्वेस्ट आली की संबंधित शाखेला त्याबाबत कळविण्यात येते व त्यानंतर त्या व्यक्तीला संघात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला जातो, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader