पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘देशाच्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्यदिनापूर्वी ‘मेरी माती, मेरा देश’ मोहीम सुरू केली जाईल,’’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक संवाद कार्यक्रमाच्या १०३ व्या भागात बोलताना मोदी म्हणाले, की देशाच्या स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’चे सर्वत्र वातावरण आहे.

१५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्रदिन जवळ आला आहे. यानिमित्त देशाच्या हुतात्मा वीर आणि वीरांगनांना अभिवादनासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ (माझी माती, माझा देश) ही देशव्यापी मोहीम सुरू केली जाणार आहे. मोदींनी सांगितले, की देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील आणि लाखो ग्रामपंचायतींत विशेष शिलालेखही उभारण्यात येतील. या अभियानांतर्गत देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे. देशाच्या गावा-गावातून, कानाकोपऱ्यातून साडेसात हजार कलशांमधून गोळा केलेली माती देशाची राजधानी दिल्लीत आणण्यात येईल. .

या यात्रेद्वारे देशाच्या विविध भागांतून रोपेही आणली जाणार आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ कलशातील माती आणि वृक्षारोपण करून ‘अमृत वाटिका’ उभारण्यात येईल. ही वाटिका ‘एक भारत : श्रेष्ठ भारता’ चे भव्य प्रतीक बनेल.  गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त मी लाल किल्ल्यावरून आगामी २५ वर्षांच्या अमृतकाळासाठी ‘पंच प्रण’विषयी (पाच प्रतिज्ञा) बोललो होतो. ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेत सहभागी होऊन आम्ही हे पाच प्रतिज्ञांच्या-संकल्पांच्या पूर्ततेसाठी शपथही घेणार आहोत, असे ते म्हणाले. देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घेतानाची आपली छबी (सेल्फी) ‘yuva.gov.in’ या संकेतस्थळावर प्रसृत करण्याचेही आवाहन मोदींनी यावेळी देशवासीयांना केले.

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही मोदींनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले. ते म्हणाले, ‘‘यावेळी पुन्हा प्रत्येक घरावर तिरंगा फडकावायचा आहे आणि ही परंपरा पुढे चालू ठेवायची आहे. या प्रयत्नांमुळे आम्हाला कर्तव्याची जाणीव होईल. स्वातंत्र्यासाठी असंख्यांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव राहील. स्वातंत्र्याचे मूल्य समजेल. प्रत्येक देशवासीयाने या अभियानात अवश्य सहभागी व्हावे.

‘महरम’शिवाय ‘हज’ करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय!’

यंदा लक्षणीय संख्येने मुस्लीम महिलांनी ‘महरम’शिवाय (पती किंवा रक्ताच्या नात्यातील पुरुष साथीदाराशिवाय) पवित्र हज यात्रा केली. हा एक मोठा बदल असल्याचे सांगून मोदींनी हज धोरणात बदल केल्याने हे घडल्याचा दावा केला. हज यात्रेहून परतलेल्या महिलांचीही अनेक आभार मानणारी पत्रे आपल्याला मिळाली आहेत, ज्यामुळे खूप समाधान मिळाले. असेही मोदी म्हणाले.

ते म्हणाले, की ‘महरम’शिवाय हज यात्रा करणाऱ्या महिलांची चार हजारांहून अधिक आहे. हा फार मोठा बदल आहे. यापूर्वी मुस्लीम महिलांना ‘महरम’शिवाय ‘हज’ची परवानगी नव्हती. ‘महरम’ हा स्त्रीचा पती किंवा रक्ताचे नाते असलेला पुरुष आहे. गेल्या काही वर्षांत हज धोरणात करण्यात आलेल्या बदलांचे स्वागत होत आहे. आमच्या मुस्लीम माता-भगिनींनी मला याबद्दल बरेच काही लिहिले आहे. आता अधिकाधिक लोकांना हजला जाण्याची संधी मिळत आहे. माता-भगिनींनी पत्र लिहून दिलेले आशीर्वाद मला खूप प्रेरणादायी आहेत. ‘महरम’शिवाय हज यात्रेला जाणाऱ्या महिलांसाठी खास महिला समन्वयकांची नियुक्ती केल्याबद्दल सौदी अरेबिया सरकारचेही मोदींनी मनापासून आभार मानले.