डास ही विश्वव्यापी समस्या असून, त्यामुळे मलेरियासारखे रोग होतात. आता मायक्रोसॉफ्ट या कंपनीने छोटी स्वयंचलित ड्रोन विमाने वापरून डास पकडण्याचा प्रकल्प आखला आहे. डास पकडल्यानंतर त्यांच्यातील रोगजंतूंचा अभ्यास केला जाणार आहे.
मायक्रोसॉफ्टने प्रिमॉनिशन प्रकल्प जाहीर केला असून, त्यात संसर्गजन्य रोग पसरण्यापूर्वीच त्याचा अंदाज घेतला जाईल. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना डेंग्यू, बर्ड फ्लू यासारखे रोग रोखणे सोपे जाईल व डासांमुळे पसरणारे रोगही थांबवता येतील. मायक्रोसॉफ्टचे संशोधक एथन जॅकसन यांनी सांगितले की, आम्ही डासांसाठी सापळा तयार केला असून त्यात हलक्या वजनाच्या विजेऱ्या (बॅटरी) वापरल्या आहेत. त्यात डासांना आकृष्ट करून पकडले जाईल, संवेदकाच्या मदतीने डासांचे वर्गीकरण केले जाईल. सध्याच्या डास पकडण्याच्या उपायांपेक्षा हा सोपा उपाय असून स्वस्तही आहे. ड्रोन विमानांच्या मदतीने हे डासांचे सापळे हवेत वाहून नेले जातील व दूरच्या भागातही डास पकडता येतील. मायक्रोसॉफ्ट संशोधकांनी ड्रोन आणखी स्वयंचलित करण्याचे ठरवले असून, त्यासाठी अमेरिकन फेडरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेची मदत घेण्यात येत आहे. डासांना पकडून गोळा केल्यानंतर त्यांच्यातील रोगजंतूचे विश्लेषण केले जाईल व कोणते विषाणू आहेत हे शोधले जाईल. डास मारून त्यांच्यातील रोगजंतू शोधणे हे व्यवहार्य नव्हते, असे पीट्सबर्ग विद्यापीठातील रेण्वीय जीवशास्त्राचे प्राध्यापक जेम्स पिपास यांनी सांगितले. अनेक विषाणूंचे आतापर्यंत न सापडलेले नमुने मिळवता येतात. पिपास यांच्या मते कोणते डास धोकादायक आहेत हे कसे ओळखणार, हा या प्रकल्पातील खरा प्रश्न आहे.