तैवानमधील कंपनीने पारदर्शक मोबाइल तयार केला असून तो वर्ष अखेरीस बाजारात येईल. तंत्रज्ञानातील ही अतिशय क्रांतिकारी घडामोड मानली जात आहे. पॉलिट्रॉन टेक्नॉलॉजीज या कंपनीने या मल्टीटच फोनचे मार्केटिंग सुरू केले आहे. त्यात स्वीचेबल ग्लास तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे.
त्यात प्रतिमा पडद्यावर साकारण्यासाठी लिक्विड क्रिस्टल रेणूंचा समावेश असलेल्या ऑरगॅनिक लाइट एमिटिंग डायोडचा (ओएलइडी) वापर केलला आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार हा फोन जेव्हा ऑफ मोडमध्ये असतो तेव्हा लिक्विड क्रिस्टल रेणू हे एका विशिष्ट पद्धतीने एकत्र येतात त्याला मिल्की पोझिशन असे म्हणतात व जेव्हा तो ऑन मोडमध्ये येतो तेव्हा ते पुन्हा अशा पद्धतीने जुळतात की, त्यामुळे टेक्स्ट, आयकॉन्स व इतर प्रतिमा पडद्यावर दिसतात. पारदर्शक वायरींच्या मदतीने यात विद्युतप्रवाह वाहत असतो. इ.स. २०१३ च्या अखेरीपर्यंत हा मोबाइल अंतिम रूपात येईल, असे पॉलिट्रॉनचे महाव्यवस्थापक सॅम यू यांनी सांगितले.
या फोनमध्ये अजूनही काही अपारदर्शक भाग आहेत त्यात एसडीकार्ड, सिमकार्ड यांचा समावेश आहे. मायक्रोफोन, कॅमेरा व बॅटरी या फोनमधून दिसू शकते पण प्रत्यक्ष उत्पादनाच्या वेळी ते दिसणार नाही अशा पद्धतीने काळ्या काचेचे आवरण त्यावर लावले जाईल. कंपनी आता इतकी छोटी लिथियम बॅटरी तयार करणार आहे की, जी फारशी लक्षात येणार नाही. जेव्हा हा फोन तयार होईल तेव्हा त्यात दोन्ही बाजूंनी दिसणारा मल्टी टच पडदा असेल. सध्या या फोनचे जे पूर्वरूप तयार करण्यात आले आहे त्यात कुठलेही सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टीम नाही. एका जपानी कंपनीने अलीकडेच मनगटी घडय़ाळात पारदर्शक लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला होता. पण इतक्या छोटय़ा आकाराच्या घडय़ाळात हार्डवेअर लावणे शक्य झाले नव्हते. मनगटी घडय़ाळात पारदर्शक पडदा वापरणे हे आव्हान आहे कारण अशा वस्तूंमध्ये बॅटरी या दुसरीकडे लावाव्या लागतात. घडय़ाळात त्या एलसीडी पॅनेलच्या मागे लावल्या जातात असे टोकयोफ्लॅशचे विपणन व्यवस्थापक पॉल कुपर यांनी सांगितले. नवीन मोबाईल फोनच्या पारदर्शकतेच्या गुणामुळे ग्राहक त्याकडे आकर्षित होतील का हा खरा प्रश्न आहे कारण त्यात इतर स्मार्टफोनसारखेच उपयोग आहेत इतर वेगळे काहीच नाही. करंट अ‍ॅनॅलिसिसचे संशोधन संचालक अ‍ॅव्ही ग्रीनगार्ट यांनी सांगितले की, जर या फोनच्या पडद्याचा दर्जा हा आजच्या एमओएलईडी व एलसीडी इतका राहिला नाही तर त्या फोनचे नावीन्य मूल्य काहीच राहणार नाही.

Story img Loader