कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या पक्ष ‘नॅशनल पीपल्स पॉवर’ (एनपीपी) ने शुक्रवारी संसदीय निवडणुकीत विजय मिळवला आणि देशातील संसदेत दोनतृतियांश बहुमत मिळविण्यासह जाफना मतदारसंघावरही आपले वर्चस्व कायम राखले आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक निकालांवरून ही माहिती मिळाली. देशाच्या दक्षिणेकडील एका प्रमुख सिंहली पक्षाने हा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जाहीर केलेल्या निवडणूक निकालांनुसार, मालिमावा (कंपास) चिन्हाखाली निवडणूक लढवणाऱ्या एनपीपीने २२५ जागांपैकी १५९ जागा जिंकल्या. एनपीपीला ६८ लाख मते किंवा ६१ टक्के मते मिळाली आणि त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली. श्रीलंकेत सजिथ प्रेमदासाचा पक्ष समगी जना बालवेगया ४० जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इलनकाई तमिळ अरासू कडचीला आठ, न्यू डेमोक्रॅटिक फ्रंटला पाच आणि श्रीलंका पोदुजाना पेरामुना आणि श्रीलंका मुस्लीम काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या.

हेही वाचा >>> दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर

२०१० नंतर प्रथमच मतदान टक्का घटला

गुरुवारच्या निवडणुकीत २०१० नंतर सर्वात कमी मतदान झाले. दिसानायके यांनी सप्टेंबरमध्ये अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लगेचच निवडणुकीची घोषणा केली होती.

नवीन संसदेचे अधिवेशन पुढील आठवड्यात सुरू होत आहे. डाव्या विचारसरणीच्या एनपीपीने जाफना जिल्ह्यात विजय मिळवून इतिहास घडवला आहे.

या सांस्कृतिक राजधानीत पारंपरिक तमिळ राष्ट्रवादी पक्षांचा पराभव केला. यापूर्वी युनायटेड नॅशनल पार्टीला जिल्ह्यात केवळ एका जागेवर विजय मिळाला होता. दिसानायके यांच्या पक्षाला जिल्ह्यात तीन जागा मिळाल्या. आयटीएके, ऑल सिलोन तमिळ काँग्रेस (एसीटीसी) आणि स्वतंत्र गटाने प्रत्येकी एक जागा जिंकली. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायके यांचे अभिनंदन केले.