अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोहळा होणार असल्यामुळे भाजपाच्या वतीने या सोहळ्यानिमित्त जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच देशातील चार पिठाच्या शंकराचार्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. मंदिराचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे आताच प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही, हे धर्म शास्त्राच्या विरोधात आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शंकराचार्यांच्या भूमिकेचा हवाला देऊन अनेक राजकीय नेत्यांनी भाजपावर मंदिर उदघाटनाची घाई केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराच्या बांधकामाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नृपेंद्र मिश्रा यांनी राम मंदिराचे बांधकाम कितपत पूर्ण झाले आहे, याची माहिती दिली. ते म्हणाले, मंदिर तर तयार झाले आहे. रामलल्लाच्या मंदिरात गर्भगृह म्हणजे गाभारा आहे. तळमजल्यावर पाच मंडप आहेत. तळमजल्यावरचे मंदिर बांधून पूर्ण झाले आहे. पहिल्या मजल्यावर राम दरबार आहे. त्याचे बांधकाम बाकी आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर फक्त अनुष्ठान होणार जाईल. तिथे विविध प्रकारचे यज्ञ केले जाणार आहेत. त्यामुळे मुख्य रामलल्लाचे मंदिर तर कधीच पूर्ण झाले आहे.

तसेच मिश्रा पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळात मंदिराचे बांधकाम करण्यासाठी ५० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ लागायचा. त्यामुळ तिथे देवाची स्थापन करणे थांबवायचे नाहीत. गाभाऱ्याचे काम झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा होऊन पूजाअर्चा करणे सुरू व्हायचे. हा विषय समजून न घेता बोलणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

२२ जानेवारी रोजी राम मंदिरात काय काय होणार आहे? याचीही माहिती मिश्रा यांनी दिली. ते म्हणाले की, दुपारी १२.३० वाजता प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त आहे. त्याच्याआधी होणारी पूजा विधी आता सुरू करण्यात आली आहे. उद्या सकाळी रामलल्ला गाभाऱ्यात येतील. तेव्हा अनेक विधी पार पडतील. विविध नद्यांमधून आणलेल्या जलाने (पाण्याने) मूर्तीचा जलाभिषेक होईल. २२ जानेवारी रोजी दुपारी साडे बाराच्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा केली जाईल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर कदाचित काही लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. तो त्यांचा मुद्दा असू शकतो. पण मंदिरातील मूर्तीमध्ये शक्तीचा संचार होणे आवश्यक आहे.

नृपेंद्र मिश्रा यांच्याप्रमाणेच विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनीही हीच भूमिका मांडली. रामलल्ला तळमजल्यावर येणार आहेत, तो पूर्ण झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, मंदिर पूर्ण झाल्यानंतरच देवाची स्थापना करायची असा काही नियम हिंदू धर्मात नाही. मोठे मंदिर बांधतना पूर्वी अनेक वर्ष लागत असत. मग तोपर्यंत देव कुठे राहायचे? माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने सोमनाथ मंदिराचे पुर्ननिर्माण केले होते. तेव्हा गाभारा बनल्यानंतर इतर बांधकाम होणे बाकी होते. मात्र राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली गेली होती. नेहरूंच्या राज्यात जे झाले, त्याची आठवण ठेवली पाहीजे, असे आलोक कुमार म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nriprendra mishra on ram mandir pran partishtha 22 january in ayodhya kvg
Show comments