सौदी अरेबियाने विविध करांमध्ये वाढ केल्यामुळे तिथे राहणे खर्चिक बनत चालले आहे. त्यामुळे सौदीमध्ये स्थायिक झालेले भारतीय आपल्या कुटुंबांना मायदेशी पाठवत आहेत. आतापर्यंत सौदीवरुन नेमके किती भारतीय मायदेशी परतले याची अधिकृत आकडेवारी भारत आणि सौदी अरेबिया दोघांकडे नाहीय. पण यंदा हैदराबादमधल्या शाळांमध्ये सौदीवरुन परतलेल्या मुलांच्या अॅडमिशनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

आतापर्यंत आम्ही आमच्या शाळेत २०० पेक्षा जास्त मुलांना प्रवेश दिला आहे. यात सौदीवरुन परतलेल्या मुलींची संख्या जास्त आहे असे एमएस ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन एम.ए.लतीफ यांनी सांगितले. सौदी अरेबियामध्ये राहणे दिवसेंदिवस खर्चिक बनत चालल्याने आम्ही मायदेशी परतलो असे पालकांनी सांगितल्याचे लतीफ म्हणाले.

हैदराबादमधल्या अन्य शाळांमध्येही असेच चित्र आहे. सौदी अरेबियात जवळपास ३० लाख भारतीय वेगवेगळया क्षेत्रांमध्ये काम करतात. केरळमधून सर्वाधिक ४० टक्के, तेलंगणमधून २० ते २५ टक्के आणि उर्वरित उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थानमधील नागरिक सौदीमध्ये स्थायिक आहेत. तेलंगणमधील हैदराबाद, करीमनगर आणि निझामाबाद या शहरातील लोक मोठया संख्येने सौदीमध्ये आहेत.

सौदी अरेबियाने वेगवेगळया सेवांच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. आधी संपूर्ण कुटुंबासाठी निवासाचे शुल्क आकारले जायचे पण आता प्रतिव्यक्ती शुल्क आकारले जाते त्यामुळे तिथे रहाणे मुश्किल झाले आहे असे समाजसेवक मोहम्मद बाकूर यांनी सांगितले. तीन दशके सौदी अरेबियामध्ये राहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ते हैदराबादला परतले.

Story img Loader