लैंगिक छळाचा आरोप झाल्याने काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया)चे अध्यक्ष फिरोज खान यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचा राजीनामा मंगळवारी स्विकारला. काँग्रेसच्या सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, फिरोज खान हे जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी असून त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी हा राजीनामा स्विकारला. दरम्यान, या लैंगिक छळाच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी काँग्रेसने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
ज्या पीडित महिलेने खान यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तिचे म्हणणे आहे की, ७-८ मे रोजी कर्नाटकातील निवडणुकीदरम्यान ती प्रचारात व्यस्त होती. दरम्यान, एनएसयुआयईच्या संमेलनासाठी ती बंगळूरूमध्ये उपस्थित होती. यावेळी फिरोज खानने पीडित महिलेला वांरवार मेसेज करुन आपल्या हॉटेलमध्ये येऊन स्वतःच्या खोलीत थांबण्यास सांगितले होते. संबंधित महिलेने नकार दिल्यानंतर खान यांनी तिच्याशी बोलणार नसल्याचे म्हटले. त्याचबरोबर संबंधित महिला ज्यावेळी आपल्या बहिणीसोबत बंगळूरूमध्ये उपस्थित होती त्यावेळी फिरोज खानने तिच्या बहिणीचाही फोन नंबर तिच्याकडून घेतला होता. त्यानंतर त्याने त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता आणि त्यानंतर पुन्हा २.३० वाजता फोन केला होता.
दरम्यान, छत्तीसगढमधील काँग्रेसच्या आणखी एका महिला कार्यकर्त्यानेही खान विरोधात दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खानपासून तिच्या जीवाला धोका असल्याचे संबंधीत तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.