हरियाणामधील नूह जिल्ह्यात दि. ३१ जुलै रोजी मोठा हिंसाचार उसळला होता. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ब्रिजमंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात आली होती. यावेळी मुस्लीमबहुल परिसरात या यात्रेवर दगडफेक करण्यात आली. ज्यामुळे हिंसाचारास सुरुवात झाली. दगडफेक होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने सदर जागेचा तपास केला आणि त्यानंतर ती जागा सहारा हॉटेल असल्याचे लक्षात आले. सदर हॉटेलचे बांधकाम अनधिकृत असल्यामुळे प्रशासनाकडून ते जमीनदोस्त करण्यात आले आहे. दरम्यान हॉटेल मालकाने दगडफेकीचा आरोप फेटाळून लावला असून व्हिडीओमध्ये जी इमारत दिसत आहे, ती सोहना परिसरातील असल्याचे त्याचे म्हणणे आहे. हरियाणा सरकारने कालपासून मोठी कारवाई सुरू केली असून ६०० हून अधिक अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडे या संकेतस्थळाला माहिती देत असताना सहारा हॉटेलचे चालक जमशेद म्हणाले, “मी नऊ वर्षांपासून सदर हॉटेल चालवत आहे. दगडफेक होत असल्याची जी इमारत व्हिडीओमध्ये दिसत आहे. ती सोहना येथील असल्याचे मी प्रशासनाला सांगत होतो. पण त्यांनी माझे काहीएक ऐकले नाही. ज्यावेळी दगडफेक झाली, त्यावेळी मी माझ्या सर्व कामगारांना हॉटेल बंद करून आपापल्या घरी जाण्यास सांगितले होते. येथे जवळच राहत असलेल्या कॉलनीमध्ये आम्ही सगळे गेलो होतो.”

हे वाचा >> हरियाणा हिंसाचार : नूह जिल्ह्यातील जलाभिषेक यात्रा काय आहे?

शनिवारपासून नूहमध्ये प्रशासनाची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत दोन डझन औषधाची आणि इतर दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहे. शहीद हसन खान मेवती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयावरही मोठ्या पोलिस बंदोबस्तात बुलडोजर चालविण्यात आले. त्याआधी शुक्रवारी ब्रिजमंडळ जलाभिषेक यात्रा ज्या नलहर मार्गावरून गेली होती, त्याठिकाणी असलेल्या अनधिकृत घरांना पाडण्यात आले होते. गुरुवारी तावडू येथील सरकारी जमिनीवरील स्थलांतरीत मजूरांचे अतिक्रमण हटविण्यात आले. या जमिनीवर बांगलादेशींनी अतिक्रमण केल्याचा आरोप केला जात आहे. सदर जमीन हरियाणा सहकारी विकास प्राधिकरणची जागा आहे, अशी माहिती पीटीआयने दिली.

तावडू येथील सरकारी जमिनीवर ज्या स्थलांतरीतांनी अतिक्रमण केले आहे, त्यांचा ३१ जुलै रोजी झालेल्या हिंसाचारात सहभाग असण्याची शक्यता आहे. नूहचे पोलिस अधीक्षक अश्वीनी कुमार म्हणाले की, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या आदेशानंतर पाडकाम करण्यात आले. राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, हिंसाचारात जे लोक सहभागी होते, त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यासाठी अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे.

हे वाचा >> हरियाणामध्ये हिंसाचार का भडकला? गोरक्षक मोनू मानेसरशी त्याचा काय संबंध?

३१ जुलै रोजी उसळलेल्या हिंसाचारामुळे सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने काढलेली धार्मिक यात्रा नूह जिल्ह्यातील मुस्लीमबहुल परिसरातून जात असताना हिंसाचार उसळळा होता. त्यानंतर राज्य सरकारने नूह जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच तणावग्रस्त परिसरात कलम १४४ नुसार जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज सकाळी (६ ऑगस्ट) जमावबंदीमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत हिंसाचारात सहभागी असलेल्या २१६ लोकांना अटक केली आहे. तसेच यासंबंधी १०४ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nuh sahara hotel from where stones were thrown demolished after haryana govt decision kvg