पीटीआय, नवी दिल्ली : मोहम्मद प्रेषितांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांना तीव्र शब्दांत फटकारले. ‘‘नूपुर यांच्या बेलगाम वक्तव्याने संपूर्ण देशभर वणवा पेटवला आणि ज्या घटना घडताहेत त्याला केवळ त्याच जबाबदार आहेत. त्यांनी त्याचवेळी त्वरित देशाची माफी मागायला हवी होती, आताही त्यांनी संपूर्ण देशाची मागावी’’, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.
प्रेषितांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यानंतर शर्मा यांच्यावर अनेक राज्यांत ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते एकत्र करण्याची शर्मा यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. प्रेषितांविरोधातील टिप्पण्या एकतर थिल्लर प्रसिद्धीसाठी, राजकीय हेतूने किंवा दुष्कृत्यासाठी केल्या गेल्या असाव्यात, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. गुन्हे एकत्र करण्याच्या शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देताना, न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने त्यांना याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. शर्मा यांनी केलेली वक्तव्ये अस्वस्थ करणारी आणि अहंकारी आहेत. अशी विधाने करण्याची काय गरज होती? त्यांच्या वक्तव्यामुळे देशात दुर्दैवी घटना घडल्या. हे लोक धार्मिक नाहीत. त्यांना इतर धर्माबद्दल आदर नाही. क्षुल्लक प्रसिद्धीसाठी, राजकीय हेतूने किंवा अन्य कोणत्या तरी दुष्कृत्यासाठी त्यांनी ही वक्तव्ये केली, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
दहा वर्षे वकिली केल्याचा दावा शर्मा करतात, परंतु त्यांची जीभ बेलगाम आहे. दूरचित्रवाहिनीवर त्यांनी केलेल्या बेजबाबदार विधानांमुळे संपूर्ण देशभर भडका उडाला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब देशाची माफी मागायला हवी होती, असेही न्यायालयाने म्हटले.
शर्मा यांच्या जिवाला धोका असल्याचे त्यांचे वकील मिणदर सिंग यांनी निदर्शनास आणल्यावर, ‘‘शर्मा यांच्या जिवाला धोका आहे की त्याच समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत’’, असा गंभीर प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. आम्ही दूरचित्रवाहिनीवरील ती चर्चा पाहिली आहे. शर्मा यांनी ज्या प्रकारे भावना भडकवल्या आहेत ते पाहता देशात जे काही घडत आहे त्यासाठी केवळ त्या एकटय़ाच जबाबदार आहेत, असे न्यायालयाने नमूद केले.
‘‘शर्मा यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल खरोखरच माफी मागितली आहे. तसेच एकाच घटनेबाबत दोन स्वतंत्र गुन्हे (एफआयआर) असू शकत नाहीत, असे सांगणारे अनेक निकाल आहेत’’, असे शर्मा यांचे वकील मिणदर सिंग न्यायालयात सांगितले. त्यावर, ‘‘शर्मा यांनी खूप उशिरा माफी मागितली. तीही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्या तर अशा शर्तीवर. वास्तविक, त्यांनी लगेच दूरचित्रवाहिनीवरून देशाची माफी मागायला हवी होती’’, असे न्यायालयाने स्पष्ट केले. शर्मा यांनी अहंकारातून याचिका दाखल केली आहे आणि देशाचा न्यायदंडाधिकारीही आपल्यापेक्षा खूप लहान आहे, असे त्यांना वाटते, अशी गंभीर टिप्पणीही न्यायालयाने केली.
एफआयआर नोंदवूनही जेव्हा तुम्हाला अटक केली जात नाही, तेव्हा त्यातून तुमचा प्रभाव दिसतो. आपल्या पाठीमागे ‘शक्ती’ आहे, असे वाटत असल्यामुळेच शर्मा यांनी बेजबाबदार विधाने केली, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. ‘‘जर तुम्ही एखाद्या पक्षाचे प्रवक्ता असाल, तर प्रवक्तेपण म्हणजे अशी वक्तव्ये करण्याचा परवाना नाही,’’ असे खंडपीठाने सुनावले.
प्रकरण काय?
एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चेदरम्यान नूपुर शर्मा यांनी प्रेषितांविरोधात वक्तव्य केले होते. त्यामुळे देशभर हिंसाचार उसळला. काही जणांचे बळी गेले. अनेक आखाती देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले. त्यांच्याविरोधात अनेक राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व एकत्रित करण्याची मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.
वृत्तवाहिनीची कानउघाडणी..
सर्वोच्च न्यायालयाने वृत्तवाहिन्यांच्या चर्चेच्या विषयांवरही कठोर ताशेरे ओढले. दूरचित्र वाहिनीवरील ती चर्चा कशासाठी होती? तो ‘अजेंडा’ दामटण्याचा कार्यक्रम होता का?.. आणि वृत्तवाहिनीने न्यायप्रविष्ट विषयच का निवडला? शिवाय, जर संबंधित वाहिनीवर चर्चेचा गैरवापर होत होता, तर शर्मा यांनीच प्रथम सूत्रसंचालकाविरोधात (अँकर) तक्रार दाखल करायला हवी होती, असेही न्यायालय म्हणाले.
न्यायालयाचे फटकारे
- नूपुर शर्मा यांच्या प्रेषितांविरोधातील टिप्पण्या एकतर थिल्लर प्रसिद्धीसाठी, राजकीय हेतूने किंवा दुष्कृत्यासाठी..
- शर्मा यांच्या जिवाला धोका आहे की त्याच समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत?
- देशात जे काही घडत आहे त्यासाठी केवळ नूपुर शर्मा एकटय़ाच जबाबदार.
- शर्मा यांची वक्तव्ये अस्वस्थ करणारी, अहंकारी. त्यांच्यामुळेच देशात दुर्दैवी घटना. त्यांना इतर धर्माबद्दल आदर नाही.
- तुम्ही एखाद्या पक्षाचे प्रवक्ता असाल, तर प्रवक्तेपण म्हणजे वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा परवाना नाही.
- शर्मा यांची याचिका अहंकारातून, न्यायदंडाधिकारीही आपल्यापेक्षा खूप लहान असल्याचे त्यांना वाटते.
संपूर्ण देशाची माफी मागा : सर्वोच्च न्यायालयाने नूपुर शर्मा यांच्यावर ताशेरे ओढताना, त्यांनी (शर्मा) संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे म्हटले. शर्मा यांनी आपल्या बेलगाम वक्तव्याने संपूर्ण देशात वणवा पेटवला. उदयपूर येथे एका टेलरची दोघांनी हत्या केली. त्या दुर्दैवी घटनेला नूपुर शर्माच जबाबदार आहेत, असे भाष्यही सर्वोच्च न्यायालयाने केले.
सर्वोच्च न्यायालयाने मांडलेली मते हे वास्तव आहे. परंतु प्रेषितांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारी व्यक्ती देशात द्वेष पसरवत नाही, तर भाजपचे सरकारच द्वेषाचे वातावरण निर्माण करीत आहे.
– राहुल गांधी, काँग्रेस नेते