नर्स, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे लोकांचे जीव वाचवितात म्हणून त्यांना देवदूत मानले जाते. मात्र याही क्षेत्रात काही माथेफिरू असतात, जे रुग्णांच्या जीवाशी खेळ करतात. अमेरिकेत एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील एका नर्सने मागच्या तीन वर्षात रुग्णांना इन्सुलिनचा ओव्हरडोस देऊन त्यांचा जीव घेतला होता. या गुन्ह्याप्रकरणात आता तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०२० ते २०२३ या काळात या नर्सने १७ रुग्णांचा जीव घेतला.
हेदर प्रेसडी (४१) असे या नर्सचे नाव आहे. पेनसिल्व्हेनियामधील या नर्सवर तीन खूनाचे गुन्हे आणि खूनाच्या प्रयत्नाचे १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रेसडीने एकूण २२ रुग्णांना इन्सुलिनचा जादा डोस दिला होता. यामध्ये काही मधुमेह नसलेलेदेखील रुग्ण होते. रात्रीच्या शिफ्टला असताना प्रेसडी हे कृत्य करायची. बहुतेक रुग्णांचा डोस मिळाल्यानंतर काही तासांत किंवा काही काळानंतर मृत्यू झाला होता. तिने ज्या रुग्णांना लक्ष्य केले, त्यांचे वय ४३ ते १०४ वर्षांच्या दरम्यान होते.
दत्तक घेतलेल्या भिक्षुक मुलासह महिला राजकारणी आढळली नको त्या स्थितीत; पतीने रंगेहात पकडताच…
इन्सुलिनचे प्रमाण जर शरिरात वाढले तर हायपोग्लाइसेमिया होऊ शकतो. ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो. मागच्यावर्षी मे महिन्यात प्रेसडीवर पहिल्यांदा दोन हत्यांचा आरोप केला गेला. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणांची चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांच्यासमोर धक्कादायक माहिती उलगडत गेली.
ज्या रुग्णांचा प्रेसडीने जीव घेतला त्यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आमचे स्वकीय ठणठणीत होते, त्यांचे आणखी आयुष्य होते, पण प्रेसडीने त्यांचा जीव घेऊन नियतीच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला. प्रेसडीच्या सहकाऱ्यांनीही तिच्याविरोधात जबाब दिला आहे. ते म्हणाले, ती आपल्या रुग्णांचा नेहमी द्वेष करायची. तिच्याकडून रुग्णांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली जायची.
किम जोंग-उनच्या मनोरंजनासाठी दरवर्षी २५ सुंदर मुलींची भरती; उत्तर कोरियातून पळालेल्या लेखिकेचा दावा
त्यादिवशी मी सैतानाला पाहिले
एका रुग्णाच्या नातेवाईकाने न्यायालयात म्हटले की, प्रेसडी मानसिक आजारी नाही किंवा ती वेडीही नाही. ती एक दुष्ट व्यक्ती आहे. ज्या रात्री तिने माझ्या वडिलांना मारले, त्या दिवशी मी सकाळी तिला पाहिले होते. ती शांत उभी होती. मला तिच्याकडू पाहून सैतान पाहिल्याची भावना झाली होती.
प्रेसडीला ७०० वर्षांची शिक्षा
पेनसिल्व्हेनिया राज्यात मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. पण क्वचितच एखाद्या आरोपीला मृत्यूदंड दिला जातो. तसेच प्रेसडीच्या वकिलांनी तिची बाजू मांडताना तिला मृत्यूदंडाची शिक्षा टाळायची असल्याचे सांगितले. गुरुवारी (३ मे) न्यायालयाने तिला दोषी ठरविले. प्रेसडीला सलग तीन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, ही शिक्षा ३८०-७६० वर्षांची असू शकते. याचा अर्थ ती प्रेसडीला आता मरेपर्यंत तुरुंगातून बाहेर येता येणार नाही.
या शिक्षेबद्दल बोलताना ॲटर्नी जनरल मिशेल हेन्नी यांनी निवेदन देताना म्हटले की, आरोपीने रुग्णांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांना एकप्रकारे विष देण्याचेच काम केले. हे रुग्ण नर्सवर उपचारासाठी अवलंबून होते. पण तिने त्यांचा विश्वासघात केला. प्रेसडीला दिलेली शेकडो वर्षांची शिक्षा गमावलेले जीव तरी परत आणू शकत नाहीत. परंतु यानिमित्ताने तिला आता पुन्हा कुणालाही मारण्याची तरी संधी मिळणार नाही.