हैदराबादमधील दिलसुखनगरमधील एका शाळेच्या लिफ्टमध्ये डोके अडकून चार वर्षांच्या मुलीचा मंगळवारी मृत्यू झाला. या अत्यंत वेदनादायी घटनेमुळे दिलसुखनगरचा संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सईदा फातिमा असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. श्री चैतन्य स्टार किड्स शाळेत ही घटना घडली.
हैदराबादमधील पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त एल. टी. चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सरीमध्ये असलेली सईदा नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी शाळेत आली होती. इतर मित्र-मैत्रिणींसोबत ती तिसऱ्या मजल्यावरील वर्गाकडे निघाली होती. लिफ्टमधून जात असताना भिंत आणि लिफ्टचा दरवाजा यामध्ये तिचे डोके सापडले आणि त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. सईदाचे डोके लिफ्टमध्ये कसे काय अडकले, याचा उलगडा झालेला नाही.
या घटनेनंतर तिच्यासोबतचे विद्यार्थी भयंकर घाबरले आहेत. शाळेतील सीसीटीव्हीमधील चित्रीकरण पाहून त्यातून नेमके काय घडले, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर सईदाच्या नातेवाईकांनी आणि इतर पालकांनी शाळेतील व्यवस्थापकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Story img Loader