बिहारच्या कटिहारमध्ये एका रुग्णालयात सर्व नर्सेसनी मिळून डॉक्टरला चांगलंच बदडल्याचं समोर आलं आहे. महिला कर्मचाऱ्याला छेडल्याच्या आरोप या डॉक्टरवर असून यामुळे संतापलेल्या नर्सेसनी त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती डॉक्टरला वाचवण्याचा प्रय़त्न करतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्यानंतर रुग्णालायतील नर्सेस वरिष्ठ डॉक्टरकडे तक्रार करण्यासाठी गेल्या. यानंतर आरोपी डॉक्टरलाही तेथे बोलावण्यात आले. आरोपी डॉक्टर तेथे आल्यानंतर नर्सेसनी त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. यानंतर परिस्थिती बिघडली आणि नर्सेसनी त्याला अक्षरशः चपला काढून बेदम मारहाण केली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले पण आरोपी तेथून फरार झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.