लेह-लडाख क्षेत्रातील न्योमा या तळावर लष्करी अधिकारी व जवान यांच्यात झालेल्या हिंसक घटनेप्रकरणी लष्कराच्या चौकशी न्यायालयाने (सीओआय) १६८ जणांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस केली आहे. या प्रकरणाचे कोर्ट मार्शलही होऊ शकते असे संकेत आहेत.
गेल्या वर्षी १० मे रोजी न्योमा फायरिंग रेंजवर लष्कराचे जवान आणि अधिकारी यांच्यात हिंसक घटना घडली. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी लष्कराने ब्रिगेडियर अजय तलवार यांच्या नेतृत्वाखाली चौकशी न्यायालयाची नेमणूक केली. त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात लष्कराच्या उत्तर कमांडच्या मुख्यालयात अहवाल सादर केला. या प्रकरणातील १८९ जणांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस चौकशी न्यायालयाने केली आहे. त्यात तीन अधिकारी, १७ कनिष्ठ अधिकारी व १४७ जवान यांचा समावेश आहे. या प्रकरणी एकंदर २१५ जणांची साक्ष नोंदवण्यात आली. संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करायची की त्यांचे कोर्ट मार्शल करायये याचा निर्णय प्रलंबित आहे.