रोजगाराच्या संधींचे बाह्य़स्रोतीकरण करण्यासंदर्भात ओबामा प्रशासनाची बदलती धोरणे लक्षात घेता ओबामा प्रशासन आता भारतविरोधी होत चालल्याचा आरोप मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधींनी केला आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेले डॉ. संपत शिवांगी हे मिसीसिपी राज्यातील निधीसंकलन करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाची धोरणे भारतास अनुकूल आहेत हा समज म्हणजे एक भ्रम आहे. उलट रिपब्लिकन पक्षाची धोरणे ही भारतास व्यापार आणि रोजगार संधींचे बाह्य़स्रोतीकरण या दृष्टिकोनांचा विचार करता अधिक अनुकूल असतील, असे शिवांगी यांनी सांगितले. हळूहळू तरुणांचा पाठिंबा रिपब्लिक पक्षाला मिळू लागल्याचा दावा शिवांगी यांनी केला.