रशियाच्या युक्रेनमधील काळ्या कृत्यांना पाठिंबा देऊन खिजवण्याच्या रशियाच्या नीतीचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी कठोर शब्दांत निषेध केला. यावर अमेरिकेच्या आक्रमकतेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही सडेतोड उत्तर दिल्याने गेले दशकभर दोन्ही देशांत चाललेल्या विखारी संघर्षांची धग अधिकच वाढली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्षपदासाठी निवड झालेले पेट्रो पोरोशेन्को यांची वॉर्सा येथे भेट घेऊन पाठिंबा देण्याचे वचन दिले. या वेळी ओबामा यांनी रशियावर चौफेर हल्ला चढवत सोव्हियत युनियनमधून बाहेर पडलेल्या युक्रेनचे ‘नाटो’च्या माध्यमातून संरक्षण केले जाईल, अशी हमी दिली. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने दाखवलेल्या आक्रमकतेमुळे पाश्चिमात्य देशांचा नेता म्हणून अमेरिकेने स्थान मिळवले. ती भूमिका कायम ठेवत ओबामांनी रशियाला स्पष्ट शब्दांत खडसावले. ते म्हणाले, की २१व्या शतकाची उभारणी करताना २०व्या शतकातील काळ्या कृत्यांचा पाया आम्ही कसा काय रचू देऊ? एकीकडे जगातील प्रत्येक राष्ट्र हे मुक्त आणि लोकशाही तत्त्वांवर चालले पाहिजे, असा आग्रह धरला जात असताना रशियाची युक्रेनमधील दादागिरी कदापि खपवून घेतली जाणार नाही.
वार्सा येथील रॉयल कॅसलसमोर झालेल्या कार्यक्रमात ओबामा बुलेटप्रुफ काचेच्या मागून भाषण करत होते. येत्या शुक्रवारी फ्रान्स येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात ओबामा आणि पुतीन एकमेकांसमोर येणार आहेत.
ओबामा यांना विश्वास
जगातील लोकशाही धार्जिण्या देशांच्या मदतीने भविष्यात युक्रेनमध्ये लोकशाही सुखासमाधानाने नांदेल, यात शंका नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच बराक ओबामा यांनी या देशात नुकतेच अस्तित्वात आलेल्या कमकुवत सरकारला तगडय़ा आव्हानांना सामोरे जाण्यास सिद्ध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी मदत करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
 अशा अस्थिरतेच्या काळात युक्रेन जनतेने योग्य निर्णय घेतला आहे आणि त्यांना अडचणींतून मार्ग काढून देईल, असा नेता निवडला आहे, असा विश्वास ओबामांनी व्यक्त केला.

Story img Loader