मुंबई हल्ल्यात सक्रिय सहभाग असलेल्या आरोपींवरील खटला अद्याप सुरू का झाला नाही, हाफिज सईद अजून मोकाट कसा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अद्याप कमी कसा झालेला नाही, अशा अनेक प्रश्नांची सरबत्तीच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर केली आहे. ओबामांच्या या सरबत्तीमुळे शरीफ यांना निरुत्तर व्हावे लागले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच नवाझ शरीफ यांनी अमेरिकेचा दौरा केला. त्यांनी गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये ओबामांची भेट घेतली. या भेटीत पाकिस्तानवर होत असलेले ड्रोन हल्ले आणि काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप या दोन मुद्दय़ांवर शरीफ भर देणार होते. मात्र, त्यांचे म्हणणे फारसे ऐकून न घेता ओबामांनी उलटपक्षी शरीफ यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला अद्याप अटक करण्यात पाकिस्तानला यश आलेले नाही. या प्रकरणातील आरोपींविरोधात खटलाही अद्याप सुरू झालेला नाही, यावरच ओबामांनी भर दिला. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शरीफ यांनीच ही माहिती दिली. भारताशी संबंध सुधारण्याबाबतही ओबामांनी सल्ला दिल्याचे ते म्हणाले. मात्र, चर्चेचा अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.
दरम्यान, अमेरिकी प्रशासनाने जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकात पाकिस्तानी पंतप्रधान भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. अलीकडेच त्यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी केलेल्या चर्चेचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.
डॉ. आफ्रिदीला सोडा
ओसामा बिन लादेनचा माग काढण्यात सीआयएला मोलाची मदत करणारा पाकिस्तानी डॉक्टर शकील आफ्रिदी याची तुरुंगातून तातडीने सुटका करावी अशी मागणी अमेरिकेने केली आहे. पाकिस्तानी न्यायालयाने आफ्रिदीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शरीफ-ओबामा यांच्यात चर्चेला सुरुवात होण्याच्या आधीच व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी या भेटीत आफ्रिदीची सुटका करण्यासाठी पाकिस्तानवर अधिक दबाव आणला जाईल असे स्पष्ट केले.

Story img Loader