जापान दौऱयावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी शिमा येथे आंतरराष्ट्रीय परिषदेतील नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर हिरोशिमातील अणुबॉम्बस्फोटाच्या ठिकाणाला भेट दिली. हिरोशिमात ज्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. तेथे उभारण्यात आलेल्या स्मारकासमोर ओबामा नतमस्तक झाले आणि श्रद्धांजली वाहिली. ओबामा यांची ही भेट ऐतिहासिक ठरली. जपानच्या हिरोशिमाला भेट देणारे बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
हिरोशिमात ६ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला होता, त्यात १ लाख ४० हजार लोक मरण पावले होते. अनेक लोक अणुबॉम्ब पडल्यानंतरच्या अग्नीच्या लोळात सापडून जागीच ठार झाले, तर काही जण जखमी अवस्थेत अनेक आजार होऊन मरण पावले होते.
दरम्यान, ओबामा जपान दौऱयात अणुहल्ल्याबाबत माफी मागणार असल्याची चर्चा पसरली होती. मात्र, अमेरिकेने दुसरे महायुद्ध संपुष्टात आणण्यासाठी हिरोशिमात केलेल्या अणुहल्ल्याबाबत माफी मागणार नाही, असे ओबामा यांनी याआधी स्पष्ट केले होते.