तालिबान्यांकडून आलेल्या धमक्यांना न धूप घालता,अफगाणिस्तानातील निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तेथील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. युद्धजन्य अफगाणिस्तानात प्रथमच शांततेच्या मार्गाने सत्तांतर घडविण्याचे वचन यामुळे पूर्ण होईल, असे त्यांनी नमूद केले.
अफगाणिस्तानातील लक्षावधी नागरिकांनी या ऐतिहासिक निवडणुकांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल अमेरिकेतील नागरिकांच्या वतीने आपण मनापासून अभिनंदन करतो, असे ओबामा यांनी नमूद केले. अमेरिका आणि आमचे सहकारी राष्ट्र अफगाणिस्तानातून फौजा मागे घेण्याच्या तयारीत असताना अफगाणिस्तानचे नागरिक आपल्या देशाची पूर्णपणे जबाबदारी घेण्याच्या तयारीत आहेत, ही बाब महत्त्वपूर्ण असून तो एक मैलाचा टप्पा ठरेल, असे ओबामा यांनी सांगितले.
या निवडणुकांमध्ये भाग न घेण्यासाठी तालिबान्यांकडून धमक्या आल्या होत्या. अफगाणिस्तानचे लोकशाही भवितव्य निश्चित करण्याच्या दृष्टीनेही या निवडणुका महत्त्वपूर्ण होत्या. मात्र,  लक्षावधी नागरिक, सुरक्षा अधिकारी, निवडणूक अधिकारी व इतरांनीही निवडणुका यशस्वी करण्यासाठी घेतलेले कष्ट अभिनंदनास पात्र आहेत,असे ओबामा म्हणाले.

Story img Loader