संरक्षणविषयक गुपीते फोडणाऱ्या एडवर्ड स्नोडेनला रशियाने आश्रय दिल्याने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा निराश झाले आहेत. मात्र, रशियाच्या या भूमिकेमुळे उभय देशांदरम्यानचे संबंध फारसे बिघडणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्नोडेनला तात्पुरता आश्रय देण्याच्या रशियाच्या निर्णयामुळे मी खूप निराश झालो आहे. अमेरिका व रशियामध्ये गुन्हेगार प्रत्यार्पण करार नाही, तरीही कायदा मोडणाऱ्या व्यक्तिंना त्या-त्या देशाकडे सोपविण्याची प्रथा उभय देशांत आहे. त्यामुळे स्नोडेनबाबतच्या त्यांचा निर्णय धक्कादायक आहे, असे ते म्हणाले. अर्थात यामुळे आमच्या संबंधात कटूता येणार नाही, याची मला खात्री आहे, येत्या वर्षअखेर रशियात होणाऱ्या जी-२० या परिषदेसाठी मी उपस्थित राहाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीआयए या अमेरिकी गुप्तहेर संस्थेशी संबंधित असणाऱ्या एका कंपनीत स्नोडेनने काही काळ नोकरी केली होती. अमेरिकेच्या संरक्षण खात्याकडून सतर्कतेच्या दृष्टिने गोळा करण्यात आलेल्या तपशीलापैकी काही माहिती स्नोडेनने उघड केल्याने जगभरात खळबळ उडाली. यानंतर अमेरिकेतून पलायन करत अनेक देशांमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्नोडेनला रशियाने अखेर तात्पुरता आश्रय दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा