पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा प्रश्न आपण पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यापुढे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या चर्चेच्या वेळी थेट उपस्थित करू, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुक्रवारी रात्री शिखर बैठकीत दिले.
पाकिस्तानमधून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी जी कृती त्या देशाकडून केली जाईल त्यावर भारत-पाकिस्तान यांच्यातील संवादाचे भवितव्य अवलंबून आहे, असे मनमोहन सिंग यांनी ओबामा यांना चर्चेच्या वेळी सांगितले. पाकिस्तान हेच दहशतवादाचे मूळ केंद्र असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. उभय देशांच्या नेत्यात शुक्रवारी शिखर बैठक झाली त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जम्मूत दोनच दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ दिला व पाकिस्तानकडून दररोज दहशतवादी कारवाया होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा शरीफ यांच्याशी चर्चेच उपस्थित करण्याचे आश्वासन ओबामा यांनी दिले. दोन्ही नेत्यात सुमारे तीन तास चर्चा झाली. अफगाणिस्तानातील परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर दहशतवादाची स्थिती आणखी बिकट होत जाणार आहे व त्यात पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. अमेरिका व भारत या दोन्ही देशात दहशतवादाच्या विरोधात सहकार्याची भूमिका घेण्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. भारताला दहशतवादाच्या विरोधात नेमके कशा प्रकारचे सहकार्य हवे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला.
येत्या २३ ऑक्टोबरला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ अमेरिकेत येत असून त्यावेळी त्यांच्याशी भारतात केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या या प्रश्नावर अमेरिकेकडून मोकळेपणाने विचारणा केली जाईल, असे ओबामा यांनी सांगितले.
पाकिस्तानने दहशतवाद्यांना मोकळे रान दिले आहे. त्यामुळे शांतता प्रक्रिया पुढे नेण्यासाठीही भारताला कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
डॉ. मनमोहन सिंग
शिरस्ता सोडून निरोप..
ओबामा हे नेहमीचा शिरस्ता सोडून मनमोहन सिंग यांना निरोप देताना ओव्हल कार्यालयाच्या दरवाजापर्यंत सोडायला आले होते. ही घटना राजशिष्टाचार बघता दुर्मीळ मानली जात आहे. ओबामा हे कधीही एखाद्या राष्ट्रप्रमुखाला सोडण्यासाठी असे ओव्हल कार्यालयाच्या उंबऱ्यापर्यंत गेल्याचे ऐकिवात नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओबामा यांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल अनुभवी नेता म्हणून जसा आदर आहे तसेच अर्थतज्ज्ञ म्हणूनही ते त्यांना खूप मानतात. दोघांचे सूर चांगलेच जुळले आहेत, त्याचेच हे द्योतक आहे. यापूर्वी नोव्हेंबर २००९ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ओबामा यांचा पाहुणचार व आगतस्वागत अनुभवलेले आहे. त्याचाच पुन:प्रत्यय यावेळीही आला. डॉ. मनमोहन सिंग हे अमेरिकेचे मित्र व पंतप्रधान काळात माझे व्यक्तिगत मित्र बनले, असे ओबामा यांनी या प्रसंगी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा