दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष आणि वर्णद्वेषविरोधी लढय़ाचे अध्वर्यू नेल्सन मंडेला यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लवकरच रुग्णालयास भेट देणार आहेत. तथापि, मंडेला यांच्या प्रकृतीत यापूर्वीच्या तुलनेत किंचितशी सुधारणा झाली असल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. फुफ्फुसातील संसर्गामुळे मंडेला यांना १८ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंडेला यांच्या प्रकृतीत किंचितशी सुधारणा झाल्याचे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी सांगितले.
ओबामा यांच्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन ऱ्होडस् यांनी, आपण मंडेला यांच्या नातेवाईकांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
मंडेला यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याबरोबरच ओबामा हे गुंतवणुकीला चालना देण्याबाबत आणि अन्नसुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांबाबतही विविध पातळीवर चर्चा करणार आहेत. ओबामा यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय, अन्य उच्चपदस्थ अधिकारी आणि उद्योगपतींचे शिष्टमंडळ येणार आहे.

Story img Loader