गेल्या पाच वर्षांपासून सर्वशक्तिमान अशा अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले बराक ओबामा यांनी, ‘आपण बायकोला घाबरतो’ अशी प्रामाणिक कबुली दिली आहे! मात्र, ओबामांचे हे बायकोला घाबरणे त्यांच्या आरोग्याच्या हितासाठीच आहे. कारण त्यांनी धूम्रपान सोडण्याचे वचन अर्धागिनीला दिले आहे आणि त्याचे पालन ते तिच्या भीतीपोटीच करतात!
‘आपण तर बुवा बायकोला घाबरूनच गेल्या सहा वर्षांपासून सिगारेटला हातसुद्धा लावलेला नाही..’ असे ओबामा यांनी संयुक्त राष्ट्रांच्या एका बैठकीदरम्यान स्पष्ट केले. मात्र, त्यांनी ही काही जाहीर कबुली दिली नाही. झाले असे की, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी ओबामा आले. त्या वेळी संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत मैना कियाई यांच्याशी हस्तांदोलन करताना ओबामा यांनी मैना यांना त्यांची धूम्रपानाची सवय गेली का, असे सहजच विचारले. त्यावर मैना यांनी त्यास नकार देत अधूनमधून धूम्रपान करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर मैना यांनी ओबामांना त्यांच्याविषयी विचारले. त्यावर ओबामांनी वरील उत्तर दिले. मैना व ओबामा यांच्यातील हे खासगी संभाषण मात्र टेबलावर असलेल्या मायक्रोफोनमुळे इतरांना स्पष्ट ऐकायला आले.

Story img Loader