युक्रेनमध्ये केलेल्या लष्करी कारवाईचे रशियाला परिणाम भोगावे लागतील, अशा इशारा नाटोचे महासचिव अँडर्स फॉग रासमुसीन यांनी बुधवारी दिला. तसेच क्रायमियाला रशियामध्ये जोडून घेण्याची कृती ही बेकायदेशीर तसेच चुकीची असल्याचे मत त्यानी व्यक्त केले.
रशियाने युक्रेनमध्ये केलेली लष्करी कारवाई ही आंतरराष्ट्रीय नियमांना पायदळी तुडवणारी आहे. तसेच ही कारवाई म्हणजे युक्रेनच्या स्वातंत्र्य आणि प्रादेशिक  एकात्मतेवर घाला घालणारे आहे. त्यामुळे याप्रकरणी नाटो रशियाविरोधात कडक धोरण अवलंबील, असे रासमुसीन म्हणाले.
 बंदुकीच्या जोरावर क्रायमियाला आपल्यासोबत घेण्याची रशियाची कृती ही बेकायदेशीर आणि चुकीची आहे. रशियाच्या या आक्रमक कृतीमुळे शांततेला तडा गेला असून याप्रकरणी शांततेच्या मार्गाने राजकीय तोडगा काढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. रशियाची कृती ही शांत आणि मुक्त जगासाठी कटिबद्ध असणाऱ्या प्रत्येकासाठी धोक्याचा इशारा आहे. तसेच शीतयुद्धानंतर युरोपियन समुदायाच्या सुरक्षा आणि स्थिरतेला सर्वात मोठा धोका असल्याचेही रासमुसीन म्हणाले.
रशियाबरोबरच्या सहकार्याचा नव्याने विचार –
रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या लष्करी कारवाईचा नाटो निषेध करते. रशियाने नियमांचे पालन केले नाही. तसेच जागतिक करारांचा सन्मान केला नाही तर रशियालादेखील त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि युक्रेन सरकारला नाटोचा पाठिंबा राहील, असे ते म्हणाले.
सीरियामध्ये रासायनिक शस्त्रांच्या वापराप्रकरणी रशियासोबत सुरू असलेली संयुक्त मोहीम तातडीने थांबवण्याचा निर्णय नाटोने घेतला आहे. तसेच रशियासोबत लष्करी आणि इतर महत्त्वाच्या बैठकाही थांबवण्यात येणार असून रशिया-नाटो सहकार्याबाबत नव्याने विचार करण्यात येणार असल्याचे रासमुसीन यांनी सांगितले.
रशियाविरोधात युक्रेन आक्रमक
क्रायमियाला जबरदस्तीने सामावून घेण्याच्या रशियाच्या भूमिकेविरोधात युक्रेनने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यापुढे रशियासोबत असलेले महत्त्वाचे संबंध संपुष्टात आणून रशियाच्या नागरिकांसाठी व्हिसाचे धोरण अत्यंत कठोर करण्याचा निर्णयही युक्रेनने केला आहे.
दरम्यान, रशियाच्या आक्रमक कारवाईचा अमेरिकेसह, जर्मन आणि युरोपियन राष्ट्रांनी विरोध केला आहे. जर्मनीने रशियाबरोबर केलेले शस्त्रास्त्रासंबंधी करार रद्द करणार असल्याचे स्पष्ट केले. तर अमेरिकेसह युरोपियन संघानेही रशियावर व्यापक र्निबध लादण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी रशियानेदेखील या र्निबधांविरोधात सडेतोड भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.