अमेरिकेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेले बराक ओबामा म्हणजे मेंढय़ाचे कातडे घालून कळपात घुसलेला लांडगा असल्याची खरमरीत टीका विकिलीक्सचे संस्थापक जुलिअन असांज यांनी गुरुवारी केली.
ओबामा सरकार यापुढेही गोपनीयताविरोधी संकेतस्थळांवर हल्ले करणे चालू ठेवेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. लैंगिक गुन्ह्याच्या आरोपावरून स्वीडनला होणारे स्थलांतर टाळण्यासाठी त्यांनी इक्वाडोरच्या लंडन येथील दूतावासात जून महिन्यापासून आश्रय घेतला आहे. तेथून त्यांनी वृत्तसंस्थेशी संपर्क साधला. ते म्हणाले,”ओबामा यांच्या विजयाने जल्लोष करण्याचे काही कारण नाही. ओबामा हे सद्गृहस्थ वाटतात आणि तीच खरी समस्या आहे. मेंढीने लांडग्याचे कातडे घालणे हे लांडग्याने मेंढीचे कातडे घालण्यापेक्षा केव्हाही चांगले. ओबामा यांच्या सरकारनेच विकिलीक्सविरोधात कारवाई केली. गेल्या चार वर्षांत सरकारने केलेला अतिरेक रोखण्यात रिपब्लिकन पक्ष अपयशी ठरला. या स्थितीत फरक पडेल असे वाटत नाही, यामुळे ओबामा सरकारकडून अधिकाधिक अतिरेक होण्याची शक्यता आहे.”  
विकिलीक्सला गोपनीय लष्करी कागदपत्रे पुरविल्याबद्दल ब्रॅडले मॅनिंग या सैनिकाला अटक करण्यात आली आहे. त्याला एकांतवासात ठेवण्यात आले असून, त्याची अमेरिकी सरकारने सुटका केली पाहिजे. ओबामा यांची फेरनिवड झाल्याचा दिवस हा मॅनिंग याच्या तुरुंगवासाचा ८९९वा दिवस होता, असे असांज यांनी सांगितले.

Story img Loader