बंदुकीने घडविण्यात येणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बंदूक नियंत्रणाच्या अनेक उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. बंदूक खरेदी करणाऱ्याची पूर्वपीठिका तपासण्यापासून ते लष्करी पद्धतीच्या हल्ल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांवर बंदी घालण्याचे ओबामा यांनी प्रस्तावित केले आहे.विस्कॉन्सिन गुरुद्वारात झालेला गोळीबार आणि कनेक्टिकट येथील शाळेत झालेले हत्याकांड या पाश्र्वभूमीवर ओबामा यांनी उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. आम्ही आता अधिक प्रतीक्षा करू शकत नाही, त्यामुळे जे करता येणे शक्य आहे ते आपण करीत आहोत, असे ओबामा यांनी बंदूक नियंत्रण कायदा प्रस्तावित करताना म्हटले आहे.
विद्यमान बंदूक कायद्यातील तरतुदी अधिक बळकट करण्यासाठी ओबामा यांनी २३ सूचना प्रस्तावित केल्या असून त्यासाठी काँग्रेसच्या मंजुरीची गरज नाही. त्यामध्ये मानसिक आरोग्य आणि शाळांची सुरक्षितता यासाठी पावले उचलण्याचा समावेश आहे.
हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांवर बंदी घालण्याची मुदत २००४ मध्ये संपुष्टात आली होती ती पुन्हा सुरू करावी आणि बंदूक खरेदी करणाऱ्याची पूर्वपीठिका तपासून घेण्यास काँग्रेसने मान्यता द्यावी, असे ओबामा यांनी म्हटले आहे.
तथापि, देशात अत्यंत शक्तिशाली अशी ‘गन लॉबी’ कार्यरत असल्याने त्यांच्या काही प्रस्तावित उपाययोजनांना काँग्रेसची मंजुरी मिळण्याची आशा कमी आहे. मात्र बंदुकीने घडविण्यात येणारा हिंसाचार कमी करण्यावर आपला भर राहील, असे ओबामा यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा