महिलांवरील हिंसाचार रोखण्याच्या नवीन कायद्यावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली आहे. देशाच्या सकारात्मक प्रगतीसाठी उचललेले हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
कायद्यावर स्वाक्षरी करण्याच्या समारंभात ओबामा म्हणाले की, यामुळे केवळ नियम बदलणार नाही, तर संस्कृती बदलणार आहे असे या कायद्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. महिलांना आवाज प्राप्त करून देण्यासाठी, त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी हा कायदा केला आहे. एक समाज म्हणून आपण घरगुती हिंसाचाराकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
एक देश म्हणून या प्रश्नाकडे अधिक वास्तवपूर्ण व अर्थपूर्ण पद्धतीने पाहणे आम्हाला शक्य झाले आहे. ज्यांच्यावर असे अत्याचार झाले आहेत त्यांना दाद मागता येणार आहे, कुणीतरी त्यांच्या बाजूने बोलणार आहे, ही भावना अधिक महत्त्वाची आहे.
१९९४ मध्ये अमेरिकेत महिला हिंसाचारविरोधी कायदा संमत करण्यात आला व नंतर त्यात काही बदल झाले, पण आता हा कायदा नव्याने लिहिण्यात आला आहे. या कायद्यान्वये आता घरेलू हिंसाचाराच्या
विरोधात काम करणाऱ्या संघटनांना पाठबळ मिळणार आहे. या प्रकरणांमधील आरोपींवर खटले भरून महिलांना न्याय देण्याची जबाबदारी ही स्थानिक अधिकाऱ्यांची असणार आहे. दरम्यान, या पाश्र्वभूमीवर हिंदू-अमेरिकन सेवा धर्मादाय संस्थेने हिंदुज अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायोलन्स अँड सेक्स्युअस अब्युज ही जनजागरण मोहीम सुरू केली आहे. एचएएससी या संस्थेने काही पोस्टर्स या जनजागरण अभियानाअंतर्गत लावली आहेत. असा उपक्रम सुरू करताना आनंदच होत आहे, असे प्रकल्पाच्या प्रवर्तक प्रीति मेहता व डॉली पंडय़ा यांनी सांगितले.

Story img Loader