अमेरिका २०१५ पर्यंत अफगाणिस्तानातील सैनिकांची संख्या  ९८०० पर्यंत खाली आणेल त्यानंतर इ.स. २०१६ पर्यंत पूर्ण माघार घेतली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सूचित केले.
ओबामा यांनी सांगितले की, अमेरिका पुढील वर्षी अफगाणिस्तानातील सैन्य निम्मे करील व त्यानंतर २०१६ पर्यंत केवळ दूतावासासाठी काही मोजके सैन्य ठेवले जाईल. दोन्ही देशातील द्विपक्षीय सुरक्षा करारात या बाबींचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. २०१५ च्या  सुरुवातीला अमेरिकेचे अफगाणिस्तानातील सैन्यबळ ९८०० इतके खाली आणले जाईल, त्यात नाटो सैन्याचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय अफगाणिस्तानला पाठिंबा देईल. अफगाणिस्तानशी आमचे संबंध युद्धापुरते मर्यादित नसून ते आर्थिक विकास, राजनैतिक सहकार्य याच्याशी संबंधित राहतील. अफगाणिस्तान सरकारने द्विपक्षीय सुरक्षा करार केला तरच २०१४ मध्ये सुरक्षा ठेवली जाणार आहे, या करारावर दोन्ही सरकारांमध्ये नुकतीच चर्चा झाली आहे. अफगाणिस्तान निवडणुकीतील दोन अध्यक्षीय उमेदवार या सुरक्षा कराराला मंजुरी देणार असल्याचे त्यांनीच सूचित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानने आता  प्रगतिपथावर वाटचाल करीत देशाची भरभराट करावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा