रशियाने युद्ध पुकारलेल्या युक्रेनमधील परिस्थिती सध्या खूपच गंभीर आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, असा आशावाद अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला. युक्रेनमधील परिस्थिती सुधारण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जातील, असे ओबामा यांनी सांगितले.
‘‘युक्रेनमधील परिस्थिती सध्या चिघळलेली आहे. युक्रेनचे माजी अध्यक्ष जरी लोकशाही प्रक्रियेने निवडून आले असले, तरी तेथील नागरिकांना ते आपले प्रतिनिधित्व करीत आहेत, असे वाटत नाही. युक्रेनच्या अध्यक्षांचे रशियाशी घनिष्ठ संबंध आहेत. मात्र नागरिकांना ते आपले वाटत नव्हते. मात्र आता निवडून आलेले नवे अध्यक्ष युक्रेनच्या हिताचे निर्णय घेत असल्याने रशियाचा त्यांना विरोध आहे,’’ असे ओबामा यांनी सांगितले. युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा अमेरिकेकडून घेतला जात असून, तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
युक्रेनची अर्थव्यवस्था पाश्चिमात्य राष्ट्रांकडे झुकेल, अशा करारपत्रावर स्वाक्षरी करण्यास युक्रेनच्या नव्या अध्यक्षांनी नकार दिला. त्यांच्या या निर्णयामुळे तेथील परिस्थिती चिघळलेली आहे, असे ओबामा यांनी सांगितले. युक्रेनमध्ये रक्तपात होऊ नये आणि तेथील नागरिकांमध्ये असुरक्षेचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जातील, असे ओबामा यांनी सांगितले.
युक्रेनने  सुरक्षा वाढवली
रशियाने युद्धाची धमकी दिल्याने युक्रेनने त्यांची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. रशियन फौजांकडून अणुऊर्जा केंद्रे लक्ष्य केली जाण्याची शक्यता असल्याने तेथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
‘‘रशियाकडून कोणत्याही क्षणी हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही गाफील राहणार नाही. युक्रेनमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, देशातील १५ अणुकेंद्रांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे,’’ असे इहोर प्रोकोपचक यांनी सांगितले. दरम्यान, युक्रेनमधील रशियाच्या फौजांनी आपला मुक्काम कायम ठेवला आहे.