करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्या धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात लहान मुलांना करोना संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बंगळुरूमध्ये गेल्या १० दिवसात ५०० हून अधिक मुलांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता ओडिशामध्ये १३८ मुलांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

रविवारी ओडिशा सरकारच्या आरोग्य विभागाने करोना आकडेवारी जारी केली. त्यात १ हजार ५८ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात १३८ मुलांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण करोनाचा आकडा ९ लाख ९४ हजार ५६५ पर्यंत पोहोचला आहे. तर करोनामुळे मृतांची संख्या ६ हजार ८८७ इतकी झाली आहे. रविवारी करोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ६१६ रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. राज्यात करोना रुग्णवाढीचा दर १.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे

राज्यातील खोर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ३७६ रुग्णांची नोंद झाली आहे. कटकमध्ये १६२, जाजपूरमध्ये ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे २७ जिल्ह्यात १०० हून कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. गजपतीत एकही करोना रुग्ण नाही. खोर्धा जिल्ह्यात १६, कटकमध्ये १२, नयागरमध्ये १३ मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. मात्र शनिवारी करोनाबाधितांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. भारतात गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ३७,९२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे २३३७ सक्रिय रुग्णांमधे घट झाली आहे.

Story img Loader