Odisha : ओडिशामधील खोरधा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. तसेच जीवन संपवण्याआधी या व्यक्तीने एक व्हिडीओ रेकॉर्ड करत पत्नीवर गंभीर आरोप केले. रामचंद्र बडजेना असं या व्यक्तीचं नाव असून पत्नीवर केलेल्या आरोपांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं घटना काय घडली?
रामचंद्र बडजेना यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पत्नी आणि त्यांच्यात नेहमी वाद होत असायचे. पत्नीच्या छळाला कंटाळून रामचंद्र बडजेना यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. वृत्तानुसार, जानकिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारणगड रेल्वे ट्रॅकवर एका मृत व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी आणि रेल्वे विभागाने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला.
यानंतर रामचंद्रच्या आई-वडील आणि कुटुंबीयांनी खोरधा पोलीसांत मुलाच्या आत्महत्येला त्याची पत्नी जबाबदार असल्याचा आरोप करत छळाची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर रामचंद्र यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केलं असल्याची माहिती सांगितली जात आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, रामचंद्रने मरण्यापूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्या व्हिडीओमध्ये तो असं म्हणत आहे की, ‘मी रामचंद्र बडजेना, माझे घर कुंभारबस्तमध्ये आहे. माझ्या पत्नीमुळे मी आज जीवन संपवत आहे.” दरम्यान, व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर रामचंद्रने ट्रेनसमोर उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आता रामचंद्र यांच्या आईने तक्रारीत आरोप केला आहे की, “त्यांची सून वारंवार घराबाहेर पडायची, तसेच ती त्याच्याशी गैरवर्तन करायची. त्यांच्या लग्नाला फक्त दोन वर्षे झाली होती आणि तेव्हापासून आम्ही खूप काही सहन केलं आहे. माझ्या मुलाचा मृत्यू त्याच्यावर झालेल्या क्रूरतेचा परिणाम आहे. आम्हाला न्याय हवा आहे”, असं म्हटलं आहे.
तसचे रामचंद्रच्या वडिलांनी म्हटलं की, “माझ्या मुलाचे लग्न झाल्यापासून माझी सून अनेक महिन्यांपासून माझ्या मुलाला सोडून तिच्या घरी जात असे. मुलाने माझ्या सुनेला आठवड्यातून एकदा तिच्या आईवडिलांच्या घरी नेले नाही तर सून गैरवर्तन करायची. हे सगळं आम्ही बराच वेळ सहन करत होतो. लग्नाचा सर्व खर्च आम्ही उचलला होता आणि माझ्या सुनेच्या कुटुंबाने आमच्याकडून २० लाख रुपये उसने घेतले होते आणि ते लग्नासाठी खर्च केले होते”, असा आरोप त्यांनी केला आहे.