भुवनेश्वर : एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबकिशोर दास (६०) यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर सहायक पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
नबकिशोर दास हे झारसुगुडा जिल्ह्यात दौऱ्यावर असताना रविवारी सकाळी पोलीस अधिकारी गोपाल दास याने त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. जखमी अवस्थेत नबकिशोर दास यांना हवाई रुग्णवाहिकेतून भुवनेश्वरला आणून अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यांच्या शरीरातून एक गोळी आरपार घुसून बाहेर पडल्याने हृदय आणि डाव्या फुफ्फुसाला गंभीर जखम झाली होती. रात्री उशिरा त्यांची मृत्यूशी झुंज संपली.
दरम्यान, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नबकिशोर दास यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर
काय घडले?
झारसुगडा जिल्ह्यातील ब्रजराजनगर शहरात एका कार्यक्रमासाठी आरोग्यमंत्री नब किशोर दास निघाले होते. लोकांना अभिवादन करण्यासाठी ते मोटारीतून उतरले असता सहायक पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
हल्लेखोर मानसिक रुग्ण?
गोळीबार करणारा पोलीस अधिकारी गोपाल दास मनोरुग्ण असल्याचा दावा त्याची पत्नी जयंती हिने केला. गेल्या सात-आठ वर्षांपासून त्याला मानसिक आजार होता. उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारली होती. सकाळी त्याने आपल्या मुलीला व्हिडिओ कॉलही केला होता, असे जयंती यांनी सांगितले.